दोन्ही राष्ट्रवादींतील जागावाटपाची चर्चा का फिस्कटली, नेमकं काय घडलं...?

दोन्ही राष्ट्रवादींतील जागावाटपाची चर्चा का फिस्कटली, नेमकं काय घडलं...?

पुणे - पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष यांच्यातील जागावाटपाची चर्चा शुक्रवारी निष्फळ ठरली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरदचंद्र पवार गटाला ‘घड्याळ’ या एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट घालून केवळ ३५ जागांचा प्रस्ताव दिल्याने ही बैठक अयशस्वी ठरली. हा प्रस्ताव मान्य नसल्याने शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक सोडली.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवावीत, हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आग्रह ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अमान्य केल्याने पुण्यातील युतीची शक्यता संपुष्टात आली. त्यामुळे आता पुण्यात पुन्हा महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. जागावाटपावर झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी खासदार वंदना चव्हाण आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे सहभागी झाले होते. मात्र, अटी मान्य न झाल्याने चर्चा पुढे जाऊ शकली नाही.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा सुरू केली. रास्ता पेठेतील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीला तिन्ही पक्षांचे शहरस्तरीय नेते उपस्थित होते. ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली, मात्र जागावाटपाबाबत नेमका निष्कर्ष काय निघाला, याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येत असतील, तर आम्ही त्यांच्यासोबत जाण्यास तयार आहोत, अशी भूमिका मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी मांडली. जागावाटपाबाबत स्वतंत्र चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास विरोध दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला होता. मात्र, आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पुण्यात महाविकास आघाडीच आकार घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये प्रशांत जगताप यांचा बळी गेला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.