नाशिक कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार कशाला? प्रत्येकाला फक्त कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंचा हल्लाबोल
नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान आगामी कुंभमेळ्याच्या तयारीवरून, रस्त्यांची झालेली दुरवस्था, प्रशासनाची ढिसाळ कार्यपद्धती आणि अंधाधुंद वृक्षतोडीवरून राज्य सरकार व प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातवरून कंत्राटदार आणण्यात आले असून सर्वांना फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं असल्याचा आरोप त्यांनी केला.

नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "मी असताना इथे आतापर्यंत दोन कुंभमेळे झाले. २०१५ च्या कुंभमेळ्यात झालेली कामे इतकी शिस्तबद्ध होती की कुठे काम सुरू आहे हे शहरालादेखील कळले नव्हते. त्यामागे पैसे काढणे किंवा कमिशनचा उद्देश नव्हता. मात्र, आता संपूर्ण शहरात खड्डे पडले आहेत, लोकांचे बळी जात आहेत, पण प्रशासनाला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. प्रशासन पूर्णपणे ढिम्म पडले असून केवळ कमिशन कसे मिळवायचे, याद्वारे अर्थकारण चालवले जात आहे."
ठळक मुद्दे:
· कंत्राटदारांवर आक्षेप: नाशिक कुंभमेळ्याच्या कामांसाठी महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मलेच नाहीत का? असा संतप्त सवाल करत गुजरातवरून कंत्राटदार आणल्याबद्दल राज ठाकरेंनी टीका केली.
· कमिशनबाजीचा आरोप: प्रशासनाला नागरिकांच्या जीवाची पर्वा नसून, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी आणि अर्थकारणाशी देणंघेणं असल्याचा घणाघात त्यांनी केला.
· नाशिककरांना सुनावले: शहराची होणारी दुर्दशा आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली वृक्षतोड दिसत असतानाही जनता भाजपलाच निवडून देत असेल, तर आता "परिस्थिती भोगा," अशी परखड भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी त्यांनी गुजरातच्या कंत्राटदारांच्या मुद्द्यावर तीव्र आक्षेप घेतला. "या कुंभमेळ्यासाठी अनेक कॉन्ट्रॅक्टर गुजरातमधून आणले, असं समजलं. महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टर जन्मलेच नाहीत का? वरून येणाऱ्या आदेशानुसार सर्वकाही चालले आहे," असे सांगत त्यांनी स्मार्ट सिटी आणि शहरातील प्रकल्पांच्या दुर्दशेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात असताना आंदोलने झाली तरी प्रशासन हलत नाही. मात्र, यावरही जनता जर भाजपलाच मते देत असेल तर "आता हे सगळे भोगा," अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.




