पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार-एकनाथ शिंदे

पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार-एकनाथ शिंदे

मुंबई (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नव्याने नियुक्त संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुखांची ऑनलाईन बैठक घेत पक्ष संघटनेचा सखोल आढावा घेतला. या बैठकीत शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत 'काम नाही तर पदही नाही' असा कडक संदेश दिला. बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मंत्री, आमदार, खासदार ही पदं बाजूला ठेवून सर्वांनी कार्यकर्त्यांप्रमाणे काम करण्याचे आदेश दिले. पक्ष वाढीसाठी प्रत्येकाने प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदेंनी प्रत्येक संपर्क प्रमुखाला थेट प्रश्न विचारत कामाचा हिशोब मागितला. आतापर्यंत किती BLA नेमले, किती वेळा मतदारसंघात भेटी दिल्या, किती बैठका घेतल्या, याची सविस्तर माहिती मागवण्यात आली. कामगिरी समाधानकारक नसल्यास थेट कारवाईचा इशाराही देण्यात आला.संपर्कप्रमुखांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कामाचा नियमित अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. काम केल्याची अपडेट आली नाही, तर थेट नारळ दिला जाईल, असा इशारा शिंदेंनी बैठकीत दिला. तसेच प्रत्येक बैठकीचे फोटो आणि तपशील रोज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

तदारसंघांचे संभाव्य विभाजन लक्षात घेऊन प्रत्येक मतदार यादीनुसार काम करण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक मतदार यादीवर दोन BLA नेमून त्यांच्यासोबत नियमित बैठक घेण्यास सांगितले.सध्या निवडणुका नसल्याने एकनाथ शिंदे यांचा भर पूर्णपणे पक्ष संघटना वाढीवर असल्याचं स्पष्ट झालं. महाराष्ट्रातील सर्व 43 हजार गावांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व दिसायला हवे, असा आदेशही त्यांनी दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. जे काम करतील तेच पदावर राहतील, जे पदावर असून काम करत नाहीत त्यांना डच्चू देणार असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला आहे. पुण्यात शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणीच बरखास्त केली गेली. यातून राज्यातील इतर पदाधिकाऱ्यांना थेट संदेश देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना पक्ष विस्ताराचे आदेशही दिले आहेत.

आता निवडणूक नसल्याने एकनाथ शिंदेंचं संपूर्ण लक्ष हे पक्ष संघटना वाढीकडे  आहे. सर्व पदाधिकाऱ्यांच्या तसेच आमदार, खासदार, मंत्र्यांच्या कामाचा आढावा स्वतः एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व 43 हजार गावांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व दिसायला हवं असे आदेशही एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. जे पक्षाचं काम करतील तेच पक्षात मोठ्या पदांवर जातील असेही संकेत शिंदेंनी दिल्याची  माहिती सूत्रांनी दिली.