परीक्षा रद्द, दादा भुसेंचा मोठा खुलासा; 2-3 दिवसांत नवी तारीख
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील लाखो टीईटी परीक्षार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. परीक्षा होण्याच्या अवघ्या काही तास आधी टीईटीचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, राज्य सरकारने 28 जून रोजी होणारी परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर यंदा विशेष खबरदारी घेण्यात आली होती. मात्र, पहाटे भिवंडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काही संशयितांकडे टीईटीची प्रश्नपत्रिका असल्याचे समोर आले.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात त्यांच्या ताब्यातील प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न जुळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.दादा भुसे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनीही पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, टीईटी परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. सुमारे 6 लाख 126 परीक्षार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तसेच पुढील 2 ते 3 दिवसांत परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल.राज्यातील 37 शहरांमधील 1,028 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात येणार असून, सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




