पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलल्याने संगमनेर-सिन्नर भागात उद्रेक; चाकण ते सिन्नर दरम्यान सर्वपक्षीय 'चक्काजाम' आंदोलन

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलल्याने संगमनेर-सिन्नर भागात उद्रेक; चाकण ते सिन्नर दरम्यान सर्वपक्षीय 'चक्काजाम' आंदोलन

नाशिक / संगमनेर: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असतानाच अचानक या मार्गात बदल करण्याचा घाट घातल्याने पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या निर्णयाच्या विरोधात आज (९ ऑगस्ट) चाकण ते सिन्नर दरम्यान सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली जोरदार 'चक्काजाम' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

काय आहे वादाचे कारण?
सुमारे २३५ किलोमीटर अंतराचा आणि ताशी २०० किमी वेगाने धावणाऱ्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी बँकांनी कर्जही मंजूर केले असून राज्य सरकारने आपला आर्थिक वाटा मान्य केला आहे. हा मूळ मार्ग पुणे ते नाशिक असा व्हाया संगमनेर-सिन्नर असा प्रस्तावित होता.

मात्र, नारायणगाव येथील जीएमआरटी (GMRT) रेडिओ दुर्बिणीवर या रेल्वेमार्गाचा परिणाम होईल, असे कारण पुढे करत हा सरळ मार्ग बदलून संगमनेरऐवजी अहिल्यानगर मार्गाने वळवण्याच्या हालचाली सुरू आहेत.

शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
"सर्व्हेक्षण पूर्ण झालेले असताना आणि सर्व मंजुऱ्या मिळालेल्या असताना अचानक मार्ग बदलण्याचे कारण काय?" असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न केवळ रेल्वेमार्गाचा नसून संपूर्ण परिसराच्या भविष्याशी जोडलेला आहे, अशी भावना लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली.

 दरम्यान, या मार्गाबाबत सरकारने एक समिती स्थापन केली असून ती ६० दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे. मात्र, सरळ आणि मंजूर झालेला मार्ग आडमार्गाने का नेला जात आहे, असा सवाल करत बाळासाहेब थोरात व इतर सर्वपक्षीय नेत्यांनी शासन निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

चक्काजाम आंदोलन चाकण ते सिन्नर मार्गावर करण्यात आले. पुणे- नाशिक जिल्ह्यातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आंदोलनात उतरल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीला फटका बसला. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे अहिल्यानगर मार्गे वळवल्याला लोकांमध्ये राग आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली, सिन्नरमध्ये खासदार वाजे आणि सत्यजीत तांबे नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रेल्वे कृती समिती आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झाल्यामुळे आंदोलनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आधीच मार्ग ठरलेला असताना आणि त्याचे सर्व्हेक्षण झालेले असताना अचानक मार्ग कसा बदलतो आणि GMRT ला अचानक कसा अडथळा निर्माण झाला, याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले आहे. यावेळी चक्काजाम आंदोलकांनी समृद्धी महामार्गदेखील रोखण्याचा प्रयत्न केला.

काकोडकर समिती
नारायणगाव जीएमआरटी (GMRT) रेडिओ दूर्बिणीवरील परिणामांमुळे पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यात येत आहे. याला ग्रामस्थांचा विरोध आहे. हा विरोध लक्षात घेऊन सरकारने डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती रेल्वेमार्गामुळे GMRTला बाधा पोहोचेल का, याचा अभ्यास करून त्याचा अहवाल 60 दिवसांत सरकारला सादर करणार आहे.