प्रज्वल रेवन्नाचा नवा कारनामा; बेकायदेशीर मोबाईल जप्त, पोलीसही चक्रावले
बेंगळूर: बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कर्नाटकचा माजी खासदार प्रज्वल रेवन्ना याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बेंगळूर येथील हाय-प्रोफाइल परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या रेवन्नाकडे पोलिसांना एक बेकायदेशीर मोबाईल फोन आढळून आला आहे.

पोलिसांनी हा मोबाईल जप्त करून तपासणी केली असता, त्यात तब्बल ८० ते ९० डाऊनलोड केलेले अश्लील (पॉर्न) व्हिडिओ आणि वर्तमानपत्रांतील महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे सापडल्याने कारागृह प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
इतक्या कडक सुरक्षेत मोबाईल आला कसा? 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, तुरुंगातील व्हीआयपी आणि हाय-प्रोफाइल कैद्यांच्या बराकींमध्ये अचानक विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. त्याचवेळी रेवन्नाच्या ताब्यातून हा फोन जप्त करण्यात आला.
प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे:
· फॉरेन्सिक तपास सुरू: हा मोबाईल फोन आणि त्यातील डिजिटल डेटा नेमका कधी व कसा डाऊनलोड केला गेला, याचा शोध घेण्यासाठी फोन फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला आहे.
· नवा गुन्हा दाखल: बेकायदेशीर मोबाईल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी रेवन्नाविरोधात आणखी एक नवीन गुन्हा दाखल केला आहे.
· सह-आरोपी कैदी: या प्रकरणात प्रताप राय नावाच्या एका कच्च्या (विचाराधीन) कैद्याचाही सहभाग निष्पन्न झाला असून त्यालाही आरोपी करण्यात आले आहे.
· सुरक्षेवर प्रश्नचिन्ह: अतिशय कडक सुरक्षा असलेल्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यापर्यंत मोबाईल पोहोचतोच कसा, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे




