बाजूच्या जहाजावर हल्ला, सांगलीच्या अजितने सांगितली आपबिती

बाजूच्या जहाजावर हल्ला, सांगलीच्या अजितने सांगितली आपबिती

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य पूर्वेत मागील काही दिवसांपासून तणाव सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे.अमेरिका आणि इस्त्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे प्रमुख नेते खामेनेई यांच्यासह अन्य ४० मोठ्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, या हल्ल्यानंतर इराणने आखाती देशांवर हल्ले सुरू केले.

मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनी इराणने बंद केली. या ठिकाणापासून एक लिटर तेल जाऊ देणार नसल्याचा इशारा दिला. यामुळे अनेक जहाजे या परिसरात अडकली आहे, यामुळे भारतात आता गॅसचा तुटवड्याच्या बातम्या समोर येत आहेत.स्ट्रेट ऑफ होर्मुझ'  परिसरात इराणकडून अनेक व्यापारी जहाजांवर हल्ले होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या वाढत्या तणावाचा फटका भारतीय खलाशांनाही बसत आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील अजित खोत या तरुणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अजित एका मालवाहू जहाजावर कार्यरत असून, त्यांचे जहाज सध्या यूएईच्या (UAE) समुद्री सीमेत अडकले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने आपली आपबिती आणि तेथील गंभीर परिस्थिती मांडली आहे.

"आमच्या जहाजाचे लोडिंग सुरू असतानाच आम्हाला इराण आणि इस्रायलमधील युद्ध सुरू झाल्याची माहिती मिळाली. मात्र, त्यावेळी 'होर्मुझची सामुद्रधुनी' बंद झाली नव्हती. त्यामुळे आम्ही लोडिंग पूर्ण करून दुबईपर्यंत पोहोचलो. परंतु, त्याच वेळी शेजारच्या एका जहाजावर भीषण हल्ला झाल्याचे आम्हाला समजले, ज्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही आमचे जहाज अँकरवर (नांगरावर) तिथेच थांबवले," असे अजित खोत यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले.

"समुद्रात नेमका कुठे हल्ला होतोय, याची माहिती आम्हाला जहाजावरील 'VHF' (वायरलेस यंत्रणेवर) मिळत होती. त्यामुळे आम्ही तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. अँकरवर (नांगरावर) अजून किती दिवस थांबावे लागेल याची खात्री नाही, जहाजावरील अन्नसाठा आम्ही पुरवून वापरत आहोत," असे अजित खोत यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले.

"होळीही आम्ही जहाजावरतीच साजरी केली. या भितीच्या दिवसात सध्या आम्ही जहाजावरतीच युद्ध थांबवण्याची वाट पाहत आहे. शीप अँकरवर अजून किती दिवस असणार आहे याचा अंदाज नाही", अशी माहिती अजित यांनी दिली.ज्यावेळी होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होईल, तेव्हाच आम्हाला भारतात येता येईल. आमचे जहाज सध्या युएईमध्ये आहे, आमचे जहाज कतार बंदरावर लोडिंग झाली आहे," अशी माहिती अजित खोत यांनी दिली.

अजित खोत यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनीही कमेंट केली आहे.दरम्यान, काल स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून भारतीय जहाजांना प्रवास करण्याची परवानगी दिल्याची बातमी समोर आली होती. यामुळे भारतीय जहाजांना सोडण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. पण, इराकडून हा दावा फेटाळल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.