बायपासच्या डांबरीकरणात भ्रष्टाचार? कंत्राटदाराला जेलमध्ये टाका; मंत्री गुलाबराव पाटलांचा संताप

बायपासच्या डांबरीकरणात भ्रष्टाचार? कंत्राटदाराला जेलमध्ये टाका; मंत्री गुलाबराव पाटलांचा संताप

मुंबई (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पाळधी-तरसोद बायपासच्या डांबरीकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हे काम करणाऱ्या कंत्राटदाराला जेलमध्ये टाकले पाहिजे, अशा शब्दांत जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला. बायपासच्या कामात नकली डांबर वापरल्याचा संशय व्यक्त करत डांबरीकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पालकमंत्र्यांनीच केल्याने चर्चेला उधाण आले आहे.सध्या पाळधी ते तरसोद बायपास रोडवरील रेल्वे उड्डाणपुलालगत माती धसल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपली व्यथा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर मांडली.

जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पाळधी ते तरसोद बायपासच्या डांबरीकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप गुलाबराव पाटील यांनी केला. बायपासवरील डांबरी रस्ता अनेक ठिकाणी खचला असून, वाहनांच्या टायर गेलेल्या ठिकाणी चाऱ्या पडल्या आहेत. वापरण्यात आलेले डांबर नकली असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पाळधी ते तरसोद बायपासवरील पुलालगत माती धसल्याने आणि रस्त्यावर चाऱ्या पडल्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. मागील काही दिवसांत दोन-तीन तरुणांना जीव गमवावा लागल्याचेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. बायपासच्या रस्ते कामाची चौकशी करून दोषी कंत्राटदाराला थेट जेलमध्ये टाकले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या उड्डाणपुलालगत बायपास महामार्ग दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात खचल्याने प्रशासनाने वाहतूक बंद केली होती. काही दिवस एकेरी वाहतूक सुरू केल्यानंतर ती पुन्हा बंद करण्यात आली.

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचेही काम सुरू असून, अधिकाऱ्यांनी या कामावर लक्ष ठेवावे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.दरम्यान, पालकमंत्र्यांनीच रस्ते कामाच्या कंत्राटदारावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्याने आता या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आरोपांवर संबंधित कंत्राटदाराकडून काय उत्तर दिले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.