बावनकुळेंचा जनता दरबार नव्हे, तर निव्वळ भेंडी बाजार; फक्त दिखावा आणि फसवणूक ; संजय पवारांचा आरोप
कोल्हापूर: महसूल मंत्री यांनी रविवारी कोल्हापुरात आयोजित केलेला जनता दरबार हा केवळ दिखावा आणि सर्वसामान्य जनतेची फसवणूक होती. तो जनता दरबार नसून निव्वळ भेंडी बाजार होता, असा घणाघाती आरोप संजय पवार यांनी केला आहे.

तासनतास वाट पाहणाऱ्या कोल्हापूरकरांची निराशा
आपल्या निवेदनात संजय पवार म्हणाले की, महसूल मंत्री कोल्हापुरात जनता दरबार घेणार अशी घोषणा होताच, आपल्याला न्याय मिळेल या भाबड्या आशेने कोल्हापुरातील हजारो नागरिक दुपारी १ वाजल्यापासूनच मोठी गर्दी करून वाट पाहत होते. मात्र, मंत्री महोदय दुपारी ४.४५ वाजता आले आणि नेहमीप्रमाणे घाईगडबडीत, ढकलाढकलीत निवेदने स्वीकारून निघून गेले. त्यामुळे न्यायाच्या अपेक्षेने आलेल्या कोल्हापूरकरांची घोर निराशा झाली आहे.
"१० वर्षांचे ऑडिट केल्यास ५०% तहसीलदार जेलमध्ये जातील"
महसूल विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढताना ते पुढे म्हणाले, "आजच्या गर्दीवरून महसूल मंत्री यांच्या हे नक्कीच लक्षात आले असेल की त्यांचे खाते किती निष्क्रिय आणि भ्रष्ट आहे. ज्यांच्याकडे पैसा आणि वशिला आहे, त्यांचीच कामे तातडीने होतात; मात्र सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही. मागील १० वर्षांचे ऑडिट केले तर ५० टक्के तहसीलदार जेलमध्ये जातील, कारण प्रचंड बेकायदेशीर कामे करून शासनाच्या तिजोरीत जाणारा महसूल या भ्रष्ट साखळीने हडप केला आहे."
सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी
"पुढील जनता दरबारात जर गर्दी कमी पाहायची असेल, तर कोल्हापूरच्या महसूल विभागाला प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी द्यावेत. तसेच वर्षानुवर्षे वशील्याच्या जोरावर कोल्हापुरात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने उचलबांगडी करण्यात यावी," अशी आक्रमक मागणीही संजय पवार यांनी या वेळी केली.




