'बिग बॉस मराठी' विजेती मेघा धाडेची आंदोलनावर स्पष्ट भूमिका; सोशल मीडियावरील पोस्टची चर्चा

'बिग बॉस मराठी' विजेती मेघा धाडेची आंदोलनावर स्पष्ट भूमिका; सोशल मीडियावरील पोस्टची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईनंतर देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, तर काही कलाकारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. अशातच 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाची विजेती आणि अभिनेत्री मेघा धाडे हिने सोशल मीडियावरील पोस्टमुळे लक्ष वेधून घेतलं आहे.

मेघा धाडेने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या पोस्टमधून तिने आंदोलनावर टीका करत सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. तिच्या काही पोस्टमध्ये आंदोलनामागील राजकारणावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

एका पोस्टवरील प्रतिक्रियेत मेघा धाडेने, "मी झुरळांऐवजी सिंहाला पाठिंबा देणारी आहे,"अशी टिप्पणी केली आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांची छायाचित्रेही दिसत होती. तिच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

मेघा धाडेने शेअर केलेल्या आणखी एका पोस्टमध्ये, "भाजपला विरोध करणे म्हणजे देशद्रोह नाही; पण देशद्रोहींना पाठिंबा देऊन भाजपला विरोध करणे देशद्रोह आहे," असा मजकूर दिसून आला. तर काही व्हिडिओंमध्ये आंदोलनादरम्यान दगडफेक झाल्यानंतरच पोलिसांनी कारवाई केल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय, एका पोस्टमध्ये "मी पंतप्रधानांच्या मागे उभी आहे," असा संदेशही शेअर करण्यात आला आहे. या सर्व पोस्टमुळे मेघा धाडेची भूमिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.दरम्यान, दिल्लीतील आंदोलनावरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर मतमतांतरे कायम असून, कलाकारांच्या प्रतिक्रियाही चर्चेचा भाग बनत आहेत.