मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर निशाणा; एमपीएससी, जेईई, नीटचे पोस्टर चर्चेत, सेलिब्रिटींचीही हजेरी
पुणे (प्रतिनिधी) : राजधानी मुंबईसह राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतील दहीहंडी उत्सवांकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं असून, सेलिब्रिटींच्या उपस्थितीसोबतच सामाजिक संदेश देणाऱ्या दहीहंड्याही चर्चेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घाटकोपरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीच्या मंचावर बाराखडी, एमपीएससी, जेईई आणि नीट परीक्षांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून राज्यातील पेपरफुटीच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आयोजक गणेश चुक्कल यांनी सांगितलं की, दहीहंडी उत्सवासाठी सुरुवातीला पोलीस आणि महापालिकेची परवानगी मिळाली होती. मात्र, ऐनवेळी परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तरीही दहीहंडी उत्सव घेण्यावर आपण ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ‘आमची दहीहंडी जेन-झीची दहीहंडी आहे. या उत्सवात मोठ्या संख्येने जेन-झी सहभागी होणार आहेत. पेपरफुटी कशा पद्धतीने होते, याबाबत या दहीहंडीच्या माध्यमातून संदेश देत आहोत,’ असं आयोजकांनी म्हटलं आहे.
या दहीहंडी उत्सवाला दिवसभरात अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव सहभागी होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. मनसे नेते अमित ठाकरे यांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
दरम्यान, दहीहंडीच्या मंचावर एमपीएससी, जेईई, नीट आणि बाराखडीचे पोस्टर लावण्यामागे विद्यार्थ्यांच्या पेपरफुटीविरोधातील लढ्याला पाठिंबा देण्याचा उद्देश असल्याचं आयोजक गणेश चुक्कल यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांनी पेपरफुटीविरोधात दिलेल्या लढ्याचा हा जल्लोष असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.




