मिस्टर मोदी, विद्यार्थ्यांची माफी मागा; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर जोरदार निशाणा
मुंबई (प्रतिनिधी) : NEET पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मध्यरात्री प्रसिद्ध झालेल्या पंतप्रधानांच्या व्हिडिओवर प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या भावना दुर्लक्षित केल्याचा आरोप केला आहे.

इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, "मिस्टर मोदी, विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशा वेळी मध्यरात्री प्रसिद्ध केलेल्या सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे त्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका. विद्यार्थ्यांची माफी मागा.
यासोबतच राहुल गांधी यांनी सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. पहिली म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. दुसरी, 'पार्लमेंट चलो' मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई व्हावी. आणि तिसरी, सरकारने विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये पेपरफुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. यासंदर्भातील मसुदा तयार असून, मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर संबंधित विधेयक संसदेत लवकरात लवकर मांडले जाईल, असे त्यांनी सांगितले.
याआधीही पंतप्रधान मोदी यांनी तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत, पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, या घोषणांवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, NEET प्रकरणावरून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.




