मुंबईतील धनाढ्य महिलेने मोबाईलवर बोलताना चिमुरड्याला उडवलं; पोलिसांनी पकडताच रावल कुटुंबीयांकडून साक्षीदाराला पैशांची ऑफर

मुंबईतील धनाढ्य महिलेने मोबाईलवर बोलताना चिमुरड्याला उडवलं; पोलिसांनी पकडताच रावल कुटुंबीयांकडून साक्षीदाराला पैशांची ऑफर

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील वांद्रे परिसरात रविवारी एका महिला चालकाने आठ वर्षांच्या चिमुरड्याला कारने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दुर्घटनेत आठ वर्षांच्या अंश गुप्ता याचा मृत्यू झाला. अंश हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तब्बल 15 वर्षांनी गुप्ता कुटुंबीयांच्या घरी पाळणा हलला होता. मात्र, या अपघातात अंशचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

मेघा रावल हिने कार चालवत असताना अंशला चिरडल्याचा आरोप आहे. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास वांद्रे पश्चिम येथील जिजामाता रोडसमोर असलेल्या जॉन बाप्टिस्ट रोडवर हा अपघात झाला. अंश गुप्ता रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी आरोपी महिला मेघा रावल हिची कार रस्त्यावरून येत होती. ती कार चालवत असताना मोबाईलवर बोलत असल्याचं सांगितलं जात आहे. याचवेळी अंश रस्ता ओलांडत असल्याचं तिच्या लक्षात आलं नाही आणि कारने त्याला धडक दिली.

यानंतर पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मेघा रावल हिच्या कुटुंबीयांनी अपघाताच्या साक्षीदाराला विकत घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मेघा रावल ही पेशाने फिटनेस कोच आणि न्यूट्रिशनिस्ट आहे. रावल कुटुंबीय सधन असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच या अपघातानंतर पोलिसांनी मेघाला ताब्यात घेतल्यानंतर रावल कुटुंबीयांनी या अपघाताचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या संदीप सिंह यांना गप्प करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

आरोपी मेघा रावलच्या परिवाराकडून संदीप सिंह यांना आपला जबाब बदलण्यासाठी पैशांची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण प्रकरणात गप्प राहण्यासाठी आरोपीच्या परिवाराकडून आपल्याला आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप स्वतः संदीप सिंह यांनी केला आहे. त्यामुळे आता साक्षीदाराला फितवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून रावल कुटुंबीयांवरही पोलीस कारवाई करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी मेघा रावल हिची कार खूप वेगात होती. ती मोबाईलवर बोलत असल्याने अंश समोर आल्यानंतर तिला कारवर तातडीने नियंत्रण मिळवता आलं नाही. त्यामुळे कार अंशच्या अंगावरून गेली. गाडीची पुढची आणि मागची डाव्या बाजूची चाकं मुलाच्या छातीवरून गेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. विशेष म्हणजे, 2 सप्टेंबरला अंशचा वाढदिवस होता. मात्र, वाढदिवसाच्या अवघ्या काही दिवस आधीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी मेघा रावल हिच्यावर कलम 105, 281,125 भारतीय न्याय संहिता (BNS), तसेच कलम 184 मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.