मुंबईत मोहरम मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटपाचा कट? 14,900 कॅप्सूल जप्त

मुंबईत मोहरम मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटपाचा कट? 14,900 कॅप्सूल जप्त

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील मोहरम मिरवणुकीदरम्यान समोर आलेल्या कथित विषारी कॅप्सूल प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या फैय्याज प्रेमजी याला न्यायालयाने 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून तपासात दररोज नवे तपशील समोर येत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीकडून तब्बल14 हजार 900 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्याने 50 किलो झिंक फॉस्फाइड आणि 30 हजार रिकाम्या कॅप्सूल ऑनलाइन मागवल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपीने मुंबईतील नागपाडा परिसरातील एका डॉरमिटरीमध्ये या कॅप्सूल तयार केल्या.मोहरमच्या अशुरा मिरवणुकीदरम्यान काही लोकांना या कॅप्सूल देण्यात आल्याचा आरोप असून, त्या घेतल्यानंतर काही जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीने एकूण 30 हजार कॅप्सूल तयार केल्याचा संशय आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ 14 हजार 900 कॅप्सूल जप्त झाल्या असून उर्वरित कॅप्सूलचा शोध सुरू आहे. आरोपीच्या मोबाईलमधील माहिती, ऑनलाइन खरेदीचे तपशील आणि झिंक फॉस्फाइडचा पुरवठा करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक परराज्यात रवाना झाले आहे.

तपासादरम्यान आरोपीने इराक आणि इराणला प्रवास केल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात इतर कोणतेही संबंध किंवा व्यापक कट होता का, याचाही तपास पोलीस करत आहेत. मात्र, अशा कोणत्याही संभाव्य संबंधांबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष जाहीर झालेला नाही.प्राथमिक चौकशीत आरोपीने वैयक्तिक कारणांमुळे आणि समाजाविषयी मनात राग असल्याच्या भावनेतून हे कृत्य केल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने गेल्या महिनाभरापासून इंटरनेटवर झिंक फॉस्फाइड, कॅप्सूल तयार करण्याची प्रक्रिया आणि संबंधित माहिती शोधल्याचे पुरावे मोबाईलमधून मिळाले आहेत.