मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार! पूर्ण उत्तरपत्रिका लिहूनही २९ विद्यार्थ्यांना ' शून्य गुण' ; पुनर्तपासणीत झाले उत्तीर्ण, तांबेंचा संताप

मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार! पूर्ण उत्तरपत्रिका लिहूनही २९ विद्यार्थ्यांना ' शून्य गुण' ; पुनर्तपासणीत झाले उत्तीर्ण, तांबेंचा संताप

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ आणि ढिसाळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. तीन वर्षांच्या एलएलबी (LLB) अंतिम वर्षाच्या निकालात, संपूर्ण उत्तरपत्रिका व्यवस्थित लिहूनही तब्बल २९ विद्यार्थ्यांना चक्क 'शून्य' गुण देण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांनी खचून जाता जेव्हा पुनर्तपासणी (Revaluation) केली, तेव्हा हेच २९ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. या प्रकारामुळे विद्यापीठाच्या पेपर तपासणीतील गंभीर निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे.

या गंभीर प्रकरणावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून दोषी अधिकारी आणि परीक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

"शून्य गुण द्यायचेच असतील, तर या व्यवस्थेला द्या"

विद्यापीठाच्या या बेजबाबदारपणावर कडक शब्दांत प्रहार करताना आमदार सत्यजीत तांबे म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासा, त्यांच्या भविष्याची परीक्षा घेऊ नका! जर शून्य गुण द्यायचेच असतील, तर अशा निष्काळजी आणि ढिसाळ व्यवस्थेला दिले पाहिजेत."

ते पुढे म्हणाले की, पुनर्तपासणीनंतर या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असला, तरी प्रत्येक विद्यार्थ्याकडे पुनर्तपासणीसाठी लागणारे पैसे, वेळ आणि मानसिक ताकद असतेच असे नाही. अशा चुकीच्या निकालांमुळे विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान होते, त्याची जबाबदारी अखेर कोण घेणार? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिक्षण व्यवस्थेच्या ऑडिटची मागणी

गेल्या काही काळापासून सातत्याने होणारे पेपरफुटीचे प्रकार, परीक्षा पद्धतीमधील गोंधळ, निकालांना होणारा उशीर आणि आता उत्तरपत्रिका तपासणीतील हा अक्षम्य हलगर्जीपणा, यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत होत चालला आहे, अशी खंत तांबे यांनी व्यक्त केली.

आमदार सत्यजीत तांबे यांनी शासनाकडे केलेल्या मुख्य मागण्या:

·         या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

·         विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालणाऱ्या दोषी अधिकारी आणि परीक्षकांवर कठोर दंडात्मक कारवाई व्हावी.

·         उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेचे स्वतंत्र आणि पारदर्शक 'थर्ड पार्टी ऑडिट' करण्यात यावे.

·         भविष्यात विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी असा खेळ होणार नाही, यासाठी एक सक्षम आणि हायटेक परीक्षा यंत्रणा उभी करावी.