मोदींचा ब्रिक्समध्ये स्पष्ट संदेश; 'आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणं हीच आमची दृष्टी'; इराण-सौदी-यूएईमध्येही संयुक्त निवेदनावर सहमती
मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला संबोधित करताना ब्रिक्स कोणाच्याही विरोधात नसून, सर्वसमावेशकतेसाठी एक व्यासपीठ असल्याचं स्पष्ट केलं. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या या शिखर परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह सदस्य देशांचे प्रमुख नेते उपस्थित होते. ब्रिक्सची एकता आणि एकमत आता ठोस परिणामांमध्ये रूपांतरित करण्याची वेळ आली आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पुढील 20 वर्षांसाठी एक नवीन आणि महत्त्वाकांक्षी अजेंडा तयार करण्यावरही त्यांनी भर दिला.

दरम्यान, ब्रिक्स देशांमध्ये संयुक्त निवेदन जारी करण्यावर एकमत झालं आहे. पश्चिम आशियात तणावाची परिस्थिती कायम असताना हा करार झाला आहे. इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या सदस्य देशांची अनेक मुद्द्यांवर वेगवेगळी भूमिका आहे. मात्र, सातत्याने संवाद साधून हे मतभेद दूर करण्यासाठी आणि सदस्य देशांमध्ये एकमत निर्माण करण्यासाठी भारताने महत्त्वाची भूमिका बजावली.
ब्रिक्समध्ये मोदींच्या भाषणातील 5 महत्त्वाचे मुद्दे : पुढील 20 वर्षांसाठी नवीन अजेंडा
ब्रिक्ससाठी पुढील 20 वर्षांचा नवीन अजेंडा तयार करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांनी मांडला. तसेच निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यावरही त्यांनी भर दिला.
**नियम-निर्मितीत ग्लोबल साऊथचा सहभाग**
AI, सायबरस्पेस, अवकाश आणि जैवतंत्रज्ञानासारख्या क्षेत्रांसाठी नियम तयार करताना विकसनशील देशांचा समान सहभाग असावा, अशी भूमिका मोदी यांनी मांडली.
**युवकांना तयार करण्यावर भर**
तरुण राजनयिक आणि धोरणकर्त्यांना वाटाघाटी तसेच कायद्याचं प्रशिक्षण देण्याची सूचना करण्यात आली.
**खलाशांसाठी आपत्कालीन नेटवर्क**
संकटात सापडलेल्या खलाशांना वैद्यकीय उपचार, कुटुंबीयांशी संपर्क आणि सुरक्षित स्थलांतराची सुविधा मिळावी यासाठी सदस्य देशांमध्ये नेटवर्क उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला.
**7 वर्षांनंतर जिनपिंग भारतात**
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तब्बल सात वर्षांनंतर भारतात दाखल झाले आहेत. पालम विमानतळावर केंद्रीय राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी त्यांचं स्वागत केलं.
गलवान संघर्षानंतर शी जिनपिंग यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. ब्रिक्स शिखर परिषदेनंतर आज संध्याकाळी त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होणार आहे.
15 जून 2020 रोजी झालेल्या गलवान संघर्षामुळे भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र, दोन्ही देशांमधील व्यापार सुरूच राहिला. चीनकडून भारताची आयात 2020-21 मध्ये अंदाजे 65 अब्ज डॉलर होती. ती 2025-26 मध्ये 132 अब्ज डॉलरहून अधिक झाली आहे.
म्हणजेच गलवान संघर्षानंतर चीनकडून भारतात होणारी आयात जवळपास दुप्पट झाली आहे. त्यामुळे आता मोदी आणि जिनपिंग यांच्या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांमधील संबंधांवर काय चर्चा होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




