'या' संकल्पासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी घेतली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट
कोल्हापूर (प्रतिनिधी) - राज्यात सार्वजनिक ठिकाणी, महामार्गांवर आणि गर्दीच्या भागांत शौचालयांच्या अभावामुळे नागरिकांना, विशेषतः महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी राज्यभर आवश्यक ठिकाणी आधुनिक शौचालय उभारण्यासाठी प्रसिद्ध वुलू कंपनीसोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत वुलू कंपनी राज्यातील विविध ठिकाणी शौचालयांची उभारणी करणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात पुढील योजना आखण्यासाठी कृष्णराज महाडिक यांनी मुंबईतील मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

महाडिक यांनी राज्यातील विविध सार्वजनिक ठिकाणी शौचालयांची वाढती गरज, त्यांचा प्रस्ताव आणि वुलू कंपनीसोबत झालेल्या कराराची माहिती मंत्री सरनाईक यांना दिली. दरम्यान, राज्यातील बसस्थानकांवर महामंडळामार्फत शौचालये उभारण्याचे काम हाती घेतले जाईल. तसेच अन्य गर्दीच्या ठिकाणी, पर्यटनस्थळांवर आणि महामार्गांवरही शौचालय उभारण्याबाबत मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा उपक्रम प्रत्यक्षात सुरू होईल, अशी माहिती कृष्णराज महाडिक यांनी दिली.




