चित्रपट रसिकांच्या मनात धर्मेंद्र सदैव स्मरणीय राहतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चित्रपट रसिकांच्या मनात धर्मेंद्र सदैव स्मरणीय राहतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा तेजस्वी तारा ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत दु: ख व्यक्त केले आहे. धर्मेंद्र यांनी स्वप्नाळू तरुण नायक ते बलाढ्य नायक म्हणून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आणि बॉलिवुडमधील ‘ही-मन’ म्हणून लोकप्रियता मिळवली. चित्रपट रसिकांच्या मनात धर्मेंद्र सदैव स्मरणीय राहतील असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हिंदी चित्रपट सृष्टीतील धर्मेंद्र यांचा प्रवास वैशिष्ट्यपूर्ण होता. कृष्ण - धवल काळापासून रंगीत चित्रपट आणि आधुनिक तांत्रिक प्रवाहापर्यंत ते सक्रिय राहिले. तरुण वयात त्यांनी स्वप्नाळू नायक म्हणून आणि नंतर विविध भूमिकांमध्ये अभिनयाने आयकॉनिक कामगिरी केली. “शोले” चित्रपटातील वीरू प्रमाणे ते प्रत्यक्ष आयुष्यातही मैत्र जपणारे होते.

धर्मेंद्र हे सहृदय, मार्गदर्शक आणि जुन्या व नव्या पिढीला जोडणारे व्यक्तिमत्व होते. त्यांनी काही काळ लोकसभेत भाजपच्या खासदार म्हणूनही सेवा दिली, परंतु चित्रपटसृष्टीतील काम आणि प्रयोगशीलतेला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले. त्यांच्या सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटांमधील कामगिरीसह एकाच वर्षात ९ हिट चित्रपट देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते चित्रपटसृष्टीत सक्रिय राहिले असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.