राजस्थाननंतर महाराष्ट्रातही नवा नियम? लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख अनिवार्य होणार

राजस्थाननंतर महाराष्ट्रातही नवा नियम? लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख अनिवार्य होणार

मुंबई (प्रतिनिधी) : बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. लवकरच राज्यातील लग्नपत्रिकांवर वर आणि वधूच्या नावासोबत त्यांची जन्मतारीख छापणे बंधनकारक केले जाऊ शकते. राजस्थान सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे विधानसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेषतः परभणी जिल्ह्यात तब्बल 48 टक्के मुलींचे अल्पवयात विवाह झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इतर काही जिल्ह्यांमध्येही बालविवाहाचे प्रमाण गंभीर असल्याचे सरकारने मान्य केले आहे.या पार्श्वभूमीवर लग्नपत्रिकेवर जन्मतारीख नमूद केल्यास वर-वधूचे वय सहज पडताळता येईल आणि बालविवाहाच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे.

बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील संधींवर विपरीत परिणाम होत असल्याचे सरकारने नमूद केले आहे. त्यामुळे विद्यमान कायद्यांच्या अंमलबजावणीसोबतच जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांनाही गती देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.दरम्यान, लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाचा अभ्यास सुरू असून, याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.