राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी चुरस; चार नावांमध्ये अंतिम निवड कोणाची?

राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी चुरस; चार नावांमध्ये अंतिम निवड कोणाची?

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी आता पक्षात जोरदार रस्सीखेच होत असल्याचं चित्र आहे. एका जागेसाठी अनेकजण इच्छुक असल्याने कुणाला संधी द्यायची यावर पक्षात चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी संध्याकाळी कोअर कमिटीची बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा होणार असल्याची माहिती आहे. विक्रम काकडे हे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव आहेत तर सुरेश बिराजदार हे धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. झिशान सिद्दीकी हे पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला होता. तर राजेंद्र जैन पक्षाचे माजी विधान परिषद आमदार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय आहेत. 

पक्षाच्या बैठकीत प्रामुख्याने या नावांवर चर्चा होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील या एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय.