मान्सूनचा मुक्काम लांबणार; महाराष्ट्रासह 15 राज्यांना वादळी पावसाचा इशारा, मुंबई, रायगड, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

मान्सूनचा मुक्काम लांबणार; महाराष्ट्रासह 15 राज्यांना वादळी पावसाचा इशारा, मुंबई, रायगड, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

दिल्ली (प्रतिनिधी) : सप्टेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी देशातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याचे अद्याप कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पुढील दोन दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे 17 सप्टेंबरपर्यंत देशातील बहुतांश भागांतून मान्सून माघारी फिरतो. यंदाही मान्सून वेळेत परतण्याचा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र बदलत्या हवामान परिस्थितीमुळे मान्सूनचा मुक्काम आणखी लांबण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांत मुसळधार पावसासह वीज पडण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. तर मध्य प्रदेशासाठी अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात देशातील अनेक भागांत पावसाने काहीशी उघडीप दिली होती. काही ठिकाणी काही तास किंवा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. मात्र ही परिस्थिती आता बदलण्याची शक्यता आहे.

12 आणि 13 सप्टेंबर रोजी देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 14 सप्टेंबरला पाऊस काही काळ विश्रांती घेऊ शकतो. तर 15 सप्टेंबरपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातही पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'ही देण्यात आला आहे.

 11 सप्टेंबर रोजी नाशिक घाट, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.

 12 सप्टेंबर रोजी धुळे, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि विजांची शक्यता आहे.

 13 सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.

 तर 14 सप्टेंबर रोजी नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

 यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.