रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नाही, कुर्ल्यात घरीच प्रसूती; नाळ बाहेर न आल्याने गर्भवतीला झोळीतून रुग्णालयात नेलं

रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नाही, कुर्ल्यात घरीच प्रसूती; नाळ बाहेर न आल्याने गर्भवतीला झोळीतून रुग्णालयात नेलं

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कुर्ला परिसरात घरच्यांच्या धाडसामुळे गर्भवती महिला आणि तिच्या नवजात बाळाचा जीव वाचला. २२ वर्षीय महिलेची पहाटे अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर घरातच प्रसूती झाली. महिलेने एका मुलाला जन्म दिला असून, बाळाचं वजन सुमारे २ किलो ४०० ग्रॅम आहे. मात्र प्रसूतीनंतर नाळ बाहेर न आल्याने महिलेला तातडीने रुग्णालयात नेणं गरजेचं होतं. नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला, मात्र रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नाही. परिस्थिती गंभीर होत असल्याने अखेर नातेवाईकांनी चादरीची झोळी तयार करून त्यातून महिलेला डॉ. आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहात दाखल केलं.

 रुग्णालयात पोहोचताच ड्युटीवरील स्टाफ नर्सने बाळाची नाळ कापली. त्यानंतर स्त्रीरोगतज्ज्ञांनी पहाटे सुमारे ५ वाजून १० मिनिटांनी आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया करत नाळेसह वार बाहेर काढली. सध्या माता आणि बाळाची प्रकृती स्थिर असून, दोघांनाही वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी रुग्णालयात जाऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासोबतच रुग्णाच्या नातेवाईकांकडूनही घटनेची माहिती घेण्यात आली.

 रुग्णालयातील डॉक्टरांकडून वेळेवर मदत मिळाली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, "मी निषेध करते अशा गोष्टीचा. प्रशासनाचा निषेध करते. त्याच्यावरती असलेले MC, त्याच्यावरती असलेले DMC झोपा काढतायत का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 पुढे बोलताना किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनावर निशाणा साधत, "काय करताय तुम्ही? तुमचे डीन आहेत, तुमचे अनेक पदं तिथे नुसती शोभेसाठी भरली आहेत का? काय अवस्था करून ठेवलीय! झोळीमधून! अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसंच त्यांनी महाराष्ट्र सरकारवरही सवाल उपस्थित केला. नर्सिंग ट्रेनिंग आणि नर्सेसची संख्या कमी करण्याच्या धोरणावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. कोविडच्या काळात तसेच मोठ्या साथीच्या आजारांमध्ये नर्सेस आणि डॉक्टरांनी महत्त्वाची भूमिका बजावली, याची आठवण त्यांनी करून दिली.

 "आम्ही फ्लोरेन्स नाइटिंगेलचा आदर्श मानणार आणि तुम्ही.." असं म्हणत त्यांनी या विषयावर २८ तारखेला पत्रकार परिषद घेऊन माहिती मांडणार असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात आणि मुंबईत परिचारिकांची पदं कमी करून प्रायव्हेट सेक्टरला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्याचा डाव असल्याचा आरोपही किशोरी पेडणेकर यांनी केला. "माझ्या हातात सगळे पुरावे येऊ दे, मी ते मांडेन,"असं म्हणत त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.