वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला? झेंडावंदनानंतर डॉक्टर शेतात गेले; बुलढाण्यात खळबळजनक घटना
मुंबई (प्रतिनिधी) : वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात घडली आहे. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या मांडवा फॉरेस्ट येथील ‘आपला दवाखाना’ येथे कार्यरत असलेले डॉ. संदीप प्रकाशराव हाडे यांनी 15 ऑगस्ट रोजी आपल्या दवाखान्याबाहेर झेंडावंदन केलं. त्यानंतर ते वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील गोहगाव हाडे या आपल्या मूळगावी गेले. तिथे त्यांच्या शेतात त्यांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मेहकर तालुक्यात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

उपकेंद्रातील सुविधा आणि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नॅशनल क्वालिटी इन्शुरन्स स्टँडर्ड (NQAS) समिती काही दिवसांत मूल्यांकनासाठी येणार होती. त्यामुळे उपकेंद्रात निकषानुसार आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध नसतानाही मूल्यांकनाची तयारी करून घेण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव टाकला जात होता, असा आरोप करण्यात आला आहे.
मनुष्यबळाची कमतरता आणि त्यातच वाढता कामाचा ताण यामुळे डॉ. संदीप हाडे मानसिक तणावात होते, असा दावा ‘आपला दवाखाना’ वैद्यकीय अधिकारी संघटनेने केला आहे. याच तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप संघटनेने केला आहे.केंद्रीय आयुष्य व आरोग्य कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यात आणि त्यांच्याच मेहकर तालुक्यात ही घटना घडल्याने आरोग्य विभागातही खळबळ उडाली आहे.
या आरोपांची गंभीर दखल घेत बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडले यांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती CHO संघटनेचे विभागीय अध्यक्ष डॉ. विशाल बाजड यांनी दिली.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विविध आंदोलनांच्या माध्यमातून अन्यायाविरोधात आवाज उठवणारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय पंढरीनाथ गवई (वय 48) यांचा चिखली येथील राहत्या घरी मृत्यू झाला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली असून, या घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
चिखली येथील राहत्या घरी विजय गवई यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, तो शवविच्छेदनासाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
विजय गवई हे आक्रमक नेतृत्व आणि अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.विजय गवई यांच्या अकस्मात निधनाने पीपल्स रिपब्लिकन पार्टीसह संपूर्ण जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. चिखली शहरासह परिसरातही शोककळा पसरली असून, या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.




