सुषमा अंधारेंपासून वरुण सरदेसाई, सचिन पडवळांपर्यंत; ठाकरेंच्या शिवसेनेकडून 40 लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर, कुणाकुणाला संधी?
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील 48 पैकी 40 लोकसभा मतदारसंघांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आगामी 2029 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेकडून मुंबईतील अनेक तरुणांना लोकसभा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

मुंबईतील आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाकरेंच्या सेनेने आगामी 2029 च्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघ, ठाणे आणि जळगाव वगळता इतर लोकसभा मतदारसंघांमध्ये पक्षाकडून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. नीट परीक्षेच्या गोंधळानंतर जंतरमंतरवर अभिजीत दीपके आणि इतर लोक एकत्र आले होते. या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा देणारा शिवसेना हा पहिला राजकीय पक्ष असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तसंच, एमपीएससीच्या गोंधळामध्ये आता राजीनामा नेमका कोणाचा घ्यायचा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तिकडे मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला, तर इकडे कोणाचा घ्यायचा? एका राजीनाम्याने सगळं संपणार आहे का? पुढच्या ठेच मागचा शहाणा, खरंच असं होणार आहे का? नाहीतर झाला तो गेला, आता माझा नंबर लागला, असं होता कामा नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणात पेपर फुटतात. आमदार फुटले तर सुरत-गुवाहाटीला जातात, आम्ही कुठे जायचं? न्याय कोणाकडे मागायचा? जे स्वतः फुटले आहेत, अशा फुटलेल्या मनोवृत्तीचे लोक काय कारभार करतील, अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.




