“मंत्र्याची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते”; ट्रोलिंगवर अमृता फडणवीसांचं स्पष्ट वक्तव्य
मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सातत्याने होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, “मंत्र्याची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते. त्याची उपाधी मला दिली गेली आहे. दरम्यान, गरब्यामध्ये लव्ह जिहादसारखा प्रकार होऊ नये, यासाठी मुस्लिमांना गरब्यात प्रवेश देऊ नये, अशी मागणी काही ठिकाणी होत आहे. यावर अमृता फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

त्या म्हणाल्या की, आपल्या धर्मात वेगवेगळे रंग आहेत. जगात सर्वाधिक ख्रिश्चन धर्माला मानणारे लोक आहेत. ते आपल्या उत्सवांमध्ये सर्व धर्माच्या लोकांचा समावेश करतात. ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा उत्सवही ते सर्वांना सेलिब्रेट करायला लावतात. त्याच पद्धतीने हिंदू धर्मातही असं व्हायला हवं.
दहीहंडी, नवरात्र आणि गरबा हे आपले चांगले सण आहेत. कोणी श्रद्धेने, कोणत्याही जाती-धर्माचा असला तरी, तिथे येत असेल आणि कोणतीही अडचण निर्माण करत नसेल, कुटुंबासोबत विश्वासाचा टिळा लावून येत असेल, तर त्याला येऊ द्यावं, असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये आयोजित दहीहंडी महोत्सवाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मुन्ना यादव यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या ठिकाणी महिलाही मनोरा लावणार आहेत आणि पुरुषही दहीहंडीत सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे छान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.
लव्ह जिहादसारख्या मुद्द्यांवर काही लोकांनी ही भूमिका घेतली असेल, त्यामागे काही कारणं असतील. मात्र, याचा आपल्याला लाँग टर्म विचार करावा लागेल. त्यासाठी कायदेही कठोर करावे लागतील. आपल्या मुलींना वेद, पुराण आणि महाभारताची माहिती आहे का? त्यांचा स्वतःच्या धर्मावर विश्वास आहे का? त्यांना स्वतःच्या धर्माचा अभिमान आहे का? मग अशा घटना कमी होतील आणि हळूहळू या घटना होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.
दहीहंडीच्या उत्सवात महिलांसाठी आणि पुरुषांसाठी मनोरे लावून कार्यक्रम होत आहे. त्यामुळे एक बॅलन्स साधला जात आहे. मात्र काही ठिकाणी पुरुष मनोरा बनवतात, तर दुसरीकडे महिलांकडून डान्स करून घेतला जातो. हेही वेगवेगळ्या प्रकारचं असतं. स्त्री-पुरुष समानता ठेवा. पबमध्ये जाता तेव्हा तुम्ही नाच करता. इथे मनोरा बनवता, गरबा खेळता, तर सगळ्यांनी सहभागी व्हावं. महिलांकडूनच डान्स का करून घेता?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतही अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “जरांगे पाटील ते माझे भाऊ आहेत. त्यांना मी घरी जेवायला येण्याचं निमंत्रण देते,” असं वक्तव्य त्यांनी केलं. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.




