हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांचा 'आरपार' लवकरच प्रदर्शित होणार ; हृताने शेअर केला पहिल्या प्रेमाचा किस्सा !

हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांचा 'आरपार' लवकरच प्रदर्शित होणार ; हृताने शेअर केला पहिल्या प्रेमाचा किस्सा !

मुंबई - मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर लवकरच 'आरपार' या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपटाबरोबरच हृता आणि ललितच्या केमिस्ट्रीवरसुद्धा प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. सध्या दोघेही चित्रपटाच्या जोरदार प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत हृताने तिच्या पहिल्या प्रेमाविषयी एक गंमतीशीर आठवण शेअर केली. ती म्हणाली, "मी आठवीत असताना एका मुलाने मला प्रपोज केलं होतं. आमचं ते फोनवरचं अफेअर होतं आणि मी आईच्या मोबाईलवरून त्याच्याशी बोलायचे. एकदा मी पकडलीही गेले. ते नातं फार काळ टिकलं नाही. फक्त दोन - तीन महिने. खरंतर त्याला पहिलं प्रेम म्हणता येईल, पण तेव्हा प्रेम म्हणजे काय, हे कळत नव्हतं. तो शाळेतला नव्हता, आम्ही एका म्युच्युअल फ्रेंडमुळे भेटलो होतो."

दरम्यान, 'आरपार' हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याच दिवशी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिकेतील 'दशावतार' हाही सिनेमा थिएटरमध्ये येतोय. त्यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर थेट टक्कर पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला अधिक पसंती देतात, हे पाहणं विशेष रंजक ठरणार आहे.