27 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा कहर? हवामान विभागाने दिला महत्त्वाचा इशारा
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून आता पूर्णपणे सक्रिय झाला असून पुढील 48 तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांसाठी महत्त्वाचे इशारे जारी करण्यात आले आहेत.

यंदा जवळपास 20 दिवस उशिराने आलेल्या मान्सूनमुळे शेतकरी आणि नागरिकांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली. मात्र आता राज्यभरात मान्सूनचा प्रभाव वाढत असून अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडत आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिमेकडील वारे अधिक मजबूत झाले असून अरबी समुद्रातील वातावरणीय परिस्थिती पावसासाठी अनुकूल बनली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
विशेषतः उत्तर कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिजोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो.याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.




