AI मुळे नोकरी गेलेल्या इंजिनिअरने संपवलं जीवन, पत्नीनेही केली आत्महत्या

AI मुळे नोकरी गेलेल्या इंजिनिअरने संपवलं जीवन, पत्नीनेही केली आत्महत्या

बेंगलोर (प्रतिनिधी) : बंगळुरूच्या कोथनूर परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. एकाच घरात, अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने एका आयटी कपलने आपलं जीवन संपवलं. ३२ वर्षीय रेड्डी यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी त्यांच्या फ्लॅटमधील बंद खोलीत आढळला आणि त्यानंतर काही वेळातच त्यांची पत्नी शाझिया सिराज हिने त्याच इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शाझिया सकाळी ७:३० च्या सुमारास नाईट शिफ्ट संपवून घरी परतली होती. घरी पोहोचल्यावर तिला अस्वस्थ वाटलं, कारण पती खोलीतून कोणताही प्रतिसाद देत नव्हता. घाबरलेल्या शाझियाने सुरक्षा रक्षकाला बोलावलं आणि बेडरुम आतून बंद असल्याचं सांगितलं. जेव्हा दरवाजा तोडला गेला, तेव्हा आतील दृश्य पाहून सर्वांचेच धाबे दणाणले- रेड्डी यांचा मृतदेह खोलीत पडला होता आणि जवळच एक सुसाईड नोट सापडली. 

शाझिया सुमारे २० मिनिटं तिथेच होती, आजूबाजूला गर्दी जमा होऊ लागली होती आणि एकच गोंधळ उडाला होता. मात्र, याच दरम्यान ती शांतपणे तिथून बाहेर पडली, लिफ्टने थेट १८ व्या मजल्यावर पोहोचली आणि तिथून खाली उडी मारली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये रेड्डी यांनी आपली नोकरी गेल्याचा आणि वाढत्या मानसिक तणावाचा उल्लेख केला आहे. एकेकाळी अमेरिकेत वर्षाला सुमारे ८० लाख रुपये कमावणाऱ्या रेड्डी यांचं आयुष्य अचानक बदलले होते. AI मुळे नोकरी गेल्याने ते पूर्णपणे खचले होते आणि नवीन नोकरी मिळत नसल्याने त्यांचा तणाव सतत वाढत होता. 

अडीच वर्षांपूर्वी लग्न केलेल्या या कपलने आपलं लग्न खूप सीक्रेट ठेवलं होतं. रेड्डी यांच्या कुटुंबाला लग्नाची माहिती होती, परंतु शाझियाच्या कुटुंबाला याची अजिबात कल्पना नव्हती. याच कारणामुळे त्यांना सुरुवातीला हैदराबादमध्ये अडचणींचा सामना करावा लागला आणि सुमारे ८ महिन्यांपूर्वी ते बंगळुरूला शिफ्ट झाले होते, जिथे शाझिया आयबीएम (IBM) मध्ये कार्यरत होती. रविवार रात्री दोघांचं शेवटचं फोनवर बोलणं झालं होतं, ज्यात रेड्डी यांनी जेवण ऑर्डर केल्याचं आणि लवकरच जेवणार असल्याचं सांगितलं होतं.