E20 जनता पार्टीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; E20 आली तर रुपया पार्टीही येईल
मुंबई (प्रतिनिधी) : सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या E20 जनता पार्टी या नागरिक अभियानावर आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी मिश्कील शैलीत, E20 पार्टी येऊ शकते. निर्मला सीतारामन यांच्यासाठी 'रुपया पार्टी'ही येऊ शकते. रुपया घसरला म्हणून 'वन रुपीज पार्टी'देखील स्थापन होऊ शकते, अशी टिप्पणी केली.

दरम्यान, E20 जनता पार्टी हे कोणतेही नोंदणीकृत राजकीय पक्ष नसून, E20 इथेनॉल-मिश्रित पेट्रोलबाबत जनजागृती करणारे एक सोशल मीडिया-आधारित नागरिक अभियान असल्याचे सांगितले जात आहे. या अभियानाची प्रमुख मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोलसोबत 100 टक्के शुद्ध (इथेनॉल-फ्री) पेट्रोलचाही पर्याय उपलब्ध करून द्यावा. सरकारच्या E20 धोरणाला विरोध नसून, ग्राहकांना आपल्या गरजेनुसार इंधन निवडण्याचा अधिकार मिळावा, अशी भूमिका या मोहिमेने मांडली आहे.
'X' आणि इन्स्टाग्रामवर या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत असून, मीम्स, व्यंग्य आणि माहितीपूर्ण पोस्टच्या माध्यमातून अनेक नागरिक या मोहिमेशी जोडले जात आहेत. अभियानाच्या सोशल मीडिया हँडलवरही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचा दावा करण्यात आला असून, ग्राहकांचे हक्क, पारदर्शकता आणि E20 धोरणावर खुली चर्चा व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.




