MPSC अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर आम्हाला तो घ्यावा लागेल; आदित्य ठाकरेंचा तीव्र आंदोलनाचा इशारा
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. एमपीएससीच्या परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

धाराशिव जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली असून, काल कैलास पाटील यांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. नोकरभरती परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र विद्यमान अध्यक्ष आणि सचिव असतील तर सुधारणा होतील का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. एसआयटी चौकशी सुरू आहे, मात्र यासोबतच न्यायालयीन चौकशीही करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. या सर्व मागण्या राज्यपालांकडे मांडल्या असून, राज्यपालांनी यामध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांनी पेपर फुटल्याचे पुरावे दिल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. एका वर्गातील किंवा एका ट्यूशन क्लासमधील व्यक्तींना पास केलं जात असल्याचंही ते म्हणाले. या सगळ्या प्रकाराची चौकशी होण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं."महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर आम्हाला तो घ्यावा लागेल. हे आंदोलन आणखी तीव्र होईल,"असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. हे आंदोलन जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये सुरू आहे. आता जिल्हा आणि तालुक्यांतून विद्यार्थी मुंबईत येऊन मोठं आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समिती ज्या सुधारणा सुचवेल, त्या एका बाजूला आहेत. मात्र ज्यांच्या अध्यक्षतेखाली पेपर फुटल्याचा आरोप आहे, त्यांनाच समितीवर ठेवलं तर दलालांचं रॅकेट कसं मोडणार?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. भीमनवार यांच्यावर यापूर्वी किती आरोप झाले आहेत आणि त्यांची किती संपत्ती आहे, हे विद्यार्थी समोर आणणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल तर राजकीय पक्षांना त्यांच्या बाजूने उभं राहावं लागेल. जिथे अन्याय होईल, तिथे आम्हाला आवाज उठवावा लागेल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. मराठा, ओबीसी, धनगर आणि आदिवासी समाजाला सरकारनं फसवल्याचा आरोपही त्यांनी केला. आंदोलन सुरू झाल्यानंतरच सरकारकडून लक्ष दिलं जातं आणि मंत्री आंदोलनात फूट पाडण्यासाठी पाठवले जातात, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.




