MPSC पेपरफुटीवर रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले, सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध जाणवतो
मुंबई (प्रतिनिधी) : राज्य लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. MPSC पेपरफुटी प्रकरणात सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध जाणवतो, असा धक्कादायक दावा रोहित पवार यांनी केला आहे. पैशाला महत्त्व देऊन पेपरफुटी करणाऱ्यांना वाचवलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आतापर्यंत 15 पेपर फुटले आहेत, मात्र विद्यार्थ्यांच्या भावनांशी सरकारला काही देणंघेणं नसल्याचं रोहित पवार म्हणाले.

"पैसे देऊन आमदार फोडा, खासदार पुढे आणि जनतेला वाऱ्यावर सोडा," अशी टीका करत सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं. आज शेतकरी आणि मजुरांचीही वाईट परिस्थिती आहे. त्यांची मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, मात्र सरकारचं त्याकडे लक्ष नसल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या तरुणाने आत्महत्या केली होती. त्याच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी रोहित पवार धाराशिवच्या परंडा तालुक्यातील खासापुरी येथे आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. पेपरफुटी प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा, माजी अध्यक्ष आणि सचिवांच्या कारभाराची चौकशी व्हावी, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या या मोर्चातून करण्यात आल्या.
दरम्यान, MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासल्याच्या घटनेवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असं योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. तसंच MPSC पेपरफुटी प्रकरणासाठी शिक्षणमंत्र्यांना दोष देणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. MPSC ही स्वतंत्र संस्था असून या प्रकरणात शिक्षणमंत्र्यांचा संबंध नसल्याचं सांगत योगेश कदम यांनी शिक्षणमंत्र्यांची पाठराखण केली.
दुसरीकडे, ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी MPSC परीक्षांमधील पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट घेतली. MPSC पेपरफुटी प्रकरणाची केवळ SIT चौकशी न करता न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसंच MPSC अध्यक्ष आणि सचिवांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. गेल्या 2-3 वर्षांपासून MPSC च्या कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि रोष आहे. अध्यक्षांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि विद्यार्थी मुंबईत येऊन आंदोलन करतील, त्याला आमचा पाठिंबा असेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
खासदार संजय राऊत यांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे सरकार मुजोर आणि मस्तवाल असून महाराष्ट्राला मोठ्या आंदोलनाच्या आणि उद्रेकाच्या दिशेने ढकलत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. MPSC ही घटनात्मक संस्था आहे, मात्र तिथल्या प्रमुखांवरच विद्यार्थ्यांचा अविश्वास निर्माण झाला आहे. शेकडो तरुण रस्त्यावर उतरले असताना सरकार मात्र गप्प बसलं आहे, असा आरोप करत संजय राऊत यांनी सरकारच्या कारभारावर कडक शब्दांत टीका केली.




