MPSC पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता; तपासात धक्कादायक माहिती समोर, आयोगाच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदभरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता असून, 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेच्या दोन ते तीन दिवस आधीच पेपर फुटल्याचं गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे.

22 जुलै रोजी जाहीर झालेल्या 488 जणांच्या अंतरिम गुणवत्ता यादीत बहुतांश विद्यार्थ्यांना 200 पैकी 120 गुणांपर्यंतच मजल मारता आली आहे. मात्र, 120 पेक्षा अधिक गुण मिळवून वरचा क्रमांक मिळवणारे काही विद्यार्थीही आहेत. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी झालेल्या इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या विद्यार्थ्यांची कामगिरी सामान्य होती आणि त्यांचा क्रमांकही हजारोंमध्ये होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांबाबतही सध्या संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात नंदुरबारमधील कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या संपर्कातील आणखी किती परीक्षार्थींना प्रश्नांचा संच दिला होता, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. फुटलेली प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचा दावा तक्रारदार परीक्षार्थीने केला आहे. त्यामुळे केवळ एका परीक्षार्थीलाच प्रश्नपत्रिकेचा संच मिळाल्याच्या आयोगाच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
प्रवीण पाटील यांच्यासह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अटक करण्यात आलेले अवर सचिव अभिजीत लेंडवे, परीक्षेचे समन्वय अधिकारी विश्वेश्वर नकाते आणि सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांच्या बँक खात्यांमधील आर्थिक व्यवहारांचीही गुन्हे शाखेकडून तपासणी सुरू आहे. या आर्थिक व्यवहारांतून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने औषध निरीक्षक पदाची प्रश्नपत्रिका फुटल्याचं मान्य केलं असून, नव्याने परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणात नंदुरबारमधील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील हे या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा ठरले आहेत.
कौटिल्य अकॅडमी गेल्या सुमारे 15 वर्षांपासून नंदुरबारमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे. स्थानिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळावं, या उद्देशाने अकॅडमीची सुरुवात करण्यात आली होती.अकॅडमीकडून आतापर्यंत दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याचा दावा करण्यात आला आहे.मात्र, सध्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणामुळे कौटिल्य अकॅडमी आणि प्रवीण पाटील चर्चेत आले आहेत. या प्रकरणातील त्यांची नेमकी भूमिका आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.




