अभिनेते भरत जाधव यांच्याकडून 'केशवराव भोसले नाट्यगृहा'च्या कामाची पाहणी; प्रशासनाला केल्या 'या' महत्त्वाच्या सूचना!
कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूरची सांस्कृतिक अस्मिता असलेल्या ऐतिहासिक 'केशवराव भोसले नाट्यगृहा'च्या पुनर्बांधणीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या सुरू असलेल्या कामाची आज सकाळी ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नाट्यगृहाच्या सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच कामाचा सविस्तर आढावा घेत आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि प्रेक्षकांच्या सोयींवर विशेष भर देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.

भरत जाधव यांनी पाहणीदरम्यान नाट्यगृहातील स्टेज ले-आऊट, अत्याधुनिक साऊंड सिस्टीम (ध्वनी व्यवस्था), प्रकाशयोजना, आसनव्यवस्था आणि इतर तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती घेतली. कलाकारांच्या आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने नाट्यगृह अधिक सुटसुटीत व्हावे, यावर त्यांनी भर दिला.
सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची सूचना
आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत भरत जाधव म्हणाले, "भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. प्रेक्षकांच्या प्रवेश (Entry) आणि निर्गमनासाठी (Exit) स्वतंत्र व सुरक्षित व्यवस्था असावी." नाट्यगृहाचे काम युद्धपातळीवर आणि दर्जेदार पद्धतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.
पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांची घेतली भेट
नात्यगृहाची पाहणी केल्यानंतर भरत जाधव यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत जाऊन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आयुक्त डॉ. भारुड यांनी पुस्तक देऊन भरत जाधव यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाच्या प्रगतीबाबत आणि ते लवकरात लवकर रसिकांच्या सेवेत दाखल होण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
या पाहणी आणि भेटीदरम्यान अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा पांढरे, व्यवस्थापक समीर महाब्री तसेच स्ट्रकवेल कंपनीचे सल्लागार राजेश यादव आदी उपस्थित होते.




