करवीर तालुक्यातील चोरी केलेल्या ११ मोटारसायकली जप्त ; १ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर (प्रतिनिधी) - करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथे राहणाऱ्या महेश पंडीत सुर्वे वय - ४० यांच्या घराच्या दारात लावलेली मोटरसायकल २९ डिसेंबर ते ३० डिसेंबर च्या दरम्यान चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी महेश सुर्वे यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, पथकाने तपास सुरू केला.

१८ जानेवारी रोजी अभिषेक सुधिर कुरणे वय २३ रा. शिये व एक अल्पवयीन मुलगा हे दोघे राजाराम बंधारा ते निगवे जाणाऱ्या रोडवर चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती करवीर पोलीसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने राजाराम बंधाऱ्यावरुन निगवे भुयेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचून अभिषेक कुरणे व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पथकाने त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांच्याजवळ असणारी मोटरसायकल ही शिये व लाटवडे येथुन चोरी केल्याचे सांगून भुयेवाडी, लाटवडे, भुये, घुणकी, शिये, वडगाव व टोप येथुनही १० मोटरसायकली जप्त केल्या असल्याची कबुली चोरट्यांनी दिली. चोरट्यांनी निवडणूकीत मिरवणूकांसाठी भाडयाने देण्याकरीता या मोटर सायकली चोरी केली असल्याची माहिती पोलीसांना दिली. त्यानुसार पोलीसांनी चोरट्यांकडून १,६४,९००/- रु. किंमतीच्या ११ मोटर सायकली जप्त केल्या आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर अपर पोलीस अधीक्षक, डॉ. धीरजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, सपोनि सरवदे, पोसई गळवे, पो. अंमलदार सुभाष सरवडेकर यांच्यासह आदी पोलीसांनी कारवाईत सहभाग घेतला होता.




