गोरगरिबांचे वाली हसन मुश्रीफ यांचे फोटो घराघरात लावा"; माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे भावनिक आवाहन

गोरगरिबांचे वाली हसन मुश्रीफ यांचे फोटो घराघरात लावा"; माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे भावनिक आवाहन

कागल : गरीबांचा खरा वाली कोण असेल, तर ते मंत्री हसन मुश्रीफ आहेत. जोपर्यंत ते गोरगरिबांच्या पाठीशी उभे आहेत, तोपर्यंत आम्ही हिमालयासारखे त्यांच्यासोबत राहू. गरीब, उपेक्षित आणि दलितांना मदत करण्याची क्षमता महाराष्ट्रात केवळ मुश्रीफ यांच्याकडेच आहे. त्यांच्या या माणुसकीच्या कार्याबद्दल प्रत्येकाने घराघरात त्यांचे फोटो लावले पाहिजेत," असे भावूक आवाहन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले. कागल येथे बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ११ कोटी रुपयांच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

 

"कामाची स्वप्नातही कल्पना केली नव्हती"
आपल्या कुटुंबातील दिव्यांगांच्या व्यथांना उजाळा देताना संजयबाबा घाटगे म्हणाले, "कामगारांच्या मुलांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्ती मिळेल, अशी आम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मुश्रीफ यांनी स्थापन केलेल्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे आज विविध योजना राबवण्यासाठी १४ हजार कोटी रुपये शिल्लक आहेत."

७५ कोटींची शिष्यवृत्ती वितरित – मंत्री हसन मुश्रीफ
कार्यक्रमात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "१९९६ चा केंद्र सरकारचा कायदा असला, तरी २००५ मध्ये मी कामगार कल्याण मंत्री झाल्यानंतरच या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. आतापर्यंत कामगारांच्या मुलांना ७५ कोटी रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली असून, लवकरच १०० कोटींचा टप्पा पूर्ण होईल. दिव्यांगांच्या कुटुंबाची फरफट थांबवण्यासाठीच आम्ही पेन्शनचा विशेष कायदा तयार केला आहे." तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी दरवर्षी नोंदणीचे नूतनीकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या प्रसंगी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनीही मुश्रीफ यांच्या आरोग्य आणि कामगार क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. कार्यक्रमाला कागलच्या नगराध्यक्षा सौ. सविता माने, पंचायत समिती सभापती सौ. सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांच्यासह विविध मान्यवर आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.