पावसामुळे पडलेली 29 झाडे हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले

पावसामुळे पडलेली 29 झाडे हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या पाच दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांतील 29 झाडे उन्मळून पडली असून, महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने कारवाई करून बहुतांश ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी खुले केले आहेत. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या निर्देशानुसार ही मोहीम रात्रंदिवस सुरू आहे. राजारामपुरी, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, संभाजीनगर, निर्माण चौक, निर्मिती कॉर्नर आणि सानेगुरुजी वसाहत परिसरात पडलेल्या झाडांचे कटिंग करून हटविण्यात आले. या कारवाईसाठी अग्निशमन विभागाची सहा वाहने, दोर, कुऱ्हाडी आणि कटरचा वापर करण्यात आला. उर्वरित ठिकाणी पडलेल्या झाडाच्या फांद्या व वृक्ष हटविण्याचे काम अग्निशमन आणि उद्यान विभागाच्या संयुक्त पथकांकडून सुरू आहे.

            दरम्यान, पावसामुळे धोकादायक ठरलेल्या इमारतींच्या ठिकाणीही अग्निशमन विभागाकडून तातडीची मदत करण्यात येत आहे. तसेच शहरातील विविध विभागीय कार्यालयांच्या हद्दीत पाणी साचलेल्या ठिकाणी आयआरबीच्या बंदिस्त गटारी उघडून पाणी निचऱ्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मुख्य रस्ते आणि चौकांमध्येही ही मोहीम सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पंचगंगा नदीघाट तसेच उतरेश्वर ते शिंगणापूर रोडवर पाणी आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित रस्ते बॅरिकेडिंग करून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून, महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.