शकुंतला मोरे यांचे निधन; ॲड. उदयकुमार मोरे याना मातृशोक
शिरोळ (प्रतिनिधी) : कन्या विद्यामंदिर शिरोळच्या माजी मुख्याध्यापिका आणि शिरोळभूषण गुरुवर्य कै. महादेव तुकाराम मोरे गुरुजी यांच्या पत्नी श्रीमती शकुंतला महादेव मोरे वय ९० यांचे गुरुवार, २ एप्रिल २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिरोळ परिसरातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
श्रीमती शकुंतला मोरे यांनी शिरोळ तालुक्यातील विविध मराठी शाळांसह कन्या विद्यामंदिर, शिरोळ येथे दीर्घकाळ मुख्याध्यापिका म्हणून सेवा बजावली होती. शिस्तप्रिय शिक्षिका आणि प्रेमळ मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख होती. अनेक पिढ्यांना व नातलगांसह गोतावळ्यास त्यांनी सुसंस्कारित करण्याचे काम केले. त्यांचे पती कै. महादेव मोरे गुरुजी हे देखील आदर्श शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते होते, ज्यांना 'शिरोळभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पतीच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाची आणि सामाजिक कार्याची धुरा समर्थपणे सांभाळली.
त्यांच्या पश्चात मुलगा भोगावती साखर, छत्रपती राजाराम साखर, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे मा. सचिव/कार्यकारी संचालक ॲड. उदयकुमार मोरे, मुलगी एस. वाय. माने हायस्कूल कागलच्या मुख्याध्यापिका सौ. राजनंदा पाटील दीर, जाऊ, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन जगदाळे वैकुंठभूमी शिरोळ येथे दिनांक 04 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08.30 वाजता आहे.




