अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरणात नवा ट्विस्ट; परमबीर सिंग यांना सहआरोपी करण्याची मागणी, १ सप्टेंबरला न्यायालयात युक्तिवाद
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याच्या आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात एक नवा खळबळजनक गौप्यस्फोट समोर आला आहे. या खटल्यातील १५२ वे साक्षीदार आणि सायबर तज्ज्ञ ईशांत सिन्हा यांच्या जबाबाचा हवाला देत तात्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) बी. आर. घाडगे यांनी परमबीर सिंग यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी एनआयए (NIA) विशेष न्यायालयात केली आहे.

कल्याण येथे आयोजित पत्रकार परिषदेत निवृत्त एसीपी घाडगे आणि त्यांचे वकील ॲड. भूषण बेंद्रे यांनी ही माहिती दिली. घाडगे यांनी न्यायालयात 'थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन' याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर येत्या १ सप्टेंबर रोजी NIA विशेष न्यायालयात महत्त्वाचा युक्तिवाद होणार आहे.
काय आहेत परमबीर सिंग यांच्यावरील आरोप?
घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटिलिया घटनेनंतर 'जैश-उल-हिंद' नावाच्या टेलिग्राम चॅनेलवरून या कटाची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. यासंदर्भातील तांत्रिक अहवालात छेडछाड करण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सायबर तज्ज्ञ ईशांत सिन्हा यांच्यावर दबाव आणला होता. मूळ अहवालात बदल करून त्यात अतिरिक्त माहिती व पोस्टर समाविष्ट करण्यास भाग पाडले गेले, तसेच या कामासाठी परमबीर सिंग यांच्या पीएकडून (PA) ईशांत सिन्हा यांना ५ लाख रुपये देण्यात आले, असा दावा सिन्हा यांच्या जबाबात असल्याचे घाडगे यांनी स्पष्ट केले.
"परमबीर सिंग यांची चौकशी का झाली नाही?
न्यायालयीन कागदपत्रांमध्ये या बाबींचा उल्लेख असतानाही एनआयएने परमबीर सिंग यांची चौकशी का केली नाही, असा सवाल घाडगे यांनी उपस्थित केला आहे. संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार शोधण्यासाठी परमबीर सिंग यांची चौकशी करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
सध्या या प्रकरणात सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्यासह १० आरोपींविरोधात दोषारोप निश्चित (Charge Frame) झाले असून खटल्याची सुनावणी सुरू आहे. अशा स्थितीत १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या युक्तिवादाकडे आणि न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




