'अजितदादा समजून घ्या' मनोज जरांगेंच्या तोंडून अनवधानाने फडणवीस, शिंदेंसह अजितदादांच्या नावाचा उल्लेख; नंतर दिलं स्पष्टीकरण
मुंबई (प्रतिनिधी) : अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण सुरू केलंय. 58 लाख नोंदींचे तत्काळ कुणबी प्रमाणपत्र सरकारनं द्यावं. आता मला वेळ देता येणार नाही. स्वार्थाने दुनिया भरली आहे, पण मी गेल्या तीन वर्षांपासून समाजासाठी प्रामाणिकपणे लढतो आहे. सरकारने महाराष्ट्रातील आंदोलकांवरील सर्व केसेस मागे घ्याव्यात. बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि मदत द्यावी. मराठ्यांच्या लेकरांनी आता वाट बघायची नाही. तातडीने अंतरवालीमध्ये वेळ मिळेल तसं येऊन वेळ द्यायचा आहे. हा शेवटचा लढा आहे. आपण विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे.

पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह अजितदादांच्या नावाचा उल्लेख केला. त्यानंतर मात्र जरांगे पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. 'अजितदादा आपल्यातून गेल्यासारखे वाटतच नाहीत, त्यामुळे तोंडातून अजितदादांचं नाव आलं,' असं म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
'सरकारशी आज गोडीने बोलतोय, उद्या बिघडू शकतो. सरकारने सर्व तोडगे वेळेत काढा. एकनाथ शिंदे साहेब समजून घ्या, मुख्यमंत्री फडणवीस साहेब समजून घ्या, साहेब बोलतोय. अजितदादा तुम्ही देखील समजून घ्या,' असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपण अनवधानाने अजितदादांचा उल्लेख केल्याचं सांगितलं. 'अजितदादा गेल्यासारखे वाटतच नाहीत, त्यामुळे तोंडातून अजितदादांचं नाव आलं,' असं त्यांनी स्पष्ट केलं.
आपण आज घराबाहेर पडलो नाही तर आपण कायम गरीब राहणार आहोत. आपल्या लढ्यामुळे पुढच्या पिढीचं कल्याण होणार आहे. मला उद्यापासून बोलता येणार नाहीये. त्यामुळे आज मी समाजापुढे माझं म्हणणं मांडतोय, असंही जरांगे पाटील म्हणाले.'आता आपण विजयाच्या उंबरठ्यावर आहोत, आता माघार नाही. गेल्या तीन वर्षांपासून आपण लढतोय, आता हा अखेरचा लढा आहे. गाफील न राहता, घरात बसून न राहता, आता मुंबई असो किंवा अंतरवाली सराटी, आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे,' असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं आहे.तसंच, 'अण्णासाहेब महामंडळातून व्याज परतावे द्या. सर्वच एकदाच द्या,' अशी मागणीही त्यांनी केली आहे.




