आई भवानी, साईबाबांची शपथ घेऊन खासदारांनी उद्धव ठाकरेंना शब्द दिला; आम्ही तुम्हाला सोडणार नाही” – संजय राऊत

आई भवानी, साईबाबांची शपथ घेऊन खासदारांनी उद्धव ठाकरेंना शब्द दिला; आम्ही तुम्हाला सोडणार नाही” – संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार फुटणार आणि शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रविवारी 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीनंतर काही खासदार पक्ष सोडू शकतात, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या सर्व बातम्या निराधार असल्याचा दावा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.

राऊत म्हणाले की, शिवसेनेचे सर्व नऊ खासदार एकत्र असून पक्षासोबत ठामपणे उभे आहेत. बैठकीत सहभागी झालेल्या खासदारांनी उद्धव ठाकरे यांना थेट आश्वासन दिले. “साहेब, आम्ही तुमच्यासोबतच आहोत,” असे सांगताना काहींनी आई भवानीची, काहींनी तुळजाभवानीची, तर काहींनी साईबाबांची शपथ घेतली. काही खासदारांनी आपल्या आईची आणि मुलांची शपथ घेऊनही पक्षनिष्ठा कायम ठेवण्याचा शब्द दिल्याचे राऊत यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे लोकप्रतिनिधींना भेटत नाहीत किंवा पक्षातील संवाद कमी झाला आहे, या चर्चांनाही त्यांनी फेटाळून लावले. महाराष्ट्रात शरद पवारांनंतर कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना सर्वाधिक वेळ देणारे नेते उद्धव ठाकरे असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागातील खासदार आणि आमदार मुंबईत आल्यानंतर नियमितपणे मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतात, असेही त्यांनी नमूद केले.

बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ‘ज्यांना जायचंय त्यांनी जा’ असे वक्तव्य केल्याची चर्चा देखील राऊत यांनी खोटी ठरवली. “मी संपूर्ण बैठकीत उपस्थित होतो. उद्धवजींनी असे कोणतेही विधान केलेले नाही. त्यांच्या तोंडी हे वाक्य मुद्दाम घालण्यात आले आहे,” असे ते म्हणाले.

दरम्यान, 19 जून रोजीच्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त काही राजकीय घडामोडी घडतील, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यावर टीका करताना राऊत म्हणाले की, विरोधकांकडे पक्षफोडीशिवाय दुसरा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. मात्र, बैठकीत खासदारांनी घेतलेल्या शपथा आणि दिलेला शब्द लक्षात घेता ते पक्षासोबतच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.