ईएसआय रुग्णालयांचा कायापालट करणार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची विधानपरिषदेत घोषणा
कोल्हापूर/प्रतिनिधी (मुंबई) : राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये (ईएसआय) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्यसेवा अधिक सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत दिली. ५० पेक्षा अधिक खाटांची क्षमता असलेल्या ईएसआय रुग्णालयांमध्ये आता सीटी स्कॅन आणि एमआरआय सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, ज्यामुळे कामगारांना उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सदस्य मनीषा कायंदे यांनी ईएसआय रुग्णालयांमधील एक्स-रे मशीन खरेदीतील अनियमितता आणि तज्ज्ञ ऑपरेटरच्या कमतरतेबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. या चर्चेत भाई जगताप, प्रसाद लाड आणि राजीव पोतदार यांनीही उपप्रश्न विचारले होते.
आमदार कायंदे यांनी कामगार विभागाच्या ६० केंद्रांमध्ये एक्स-रे मशीन हाताळण्यासाठी रेडिओलॉजीचे प्रशिक्षित आणि तज्ज्ञ ऑपरेटर तातडीने नियुक्त करण्याची मागणी केली. याला उत्तर देताना मंत्री आबिटकर म्हणाले, "ईएसआय रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली, तरी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या उपलब्ध एमबीबीएस डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्यामार्फत सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत."
आरोग्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, ईएसआय योजनेअंतर्गत कामगारांना मोफत उपचाराची सुविधा मिळते, परंतु या योजनेबाबत अद्याप मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज आहे. रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींसोबत लवकरच एक विशेष बैठक घेऊन पुढील सुधारणा केल्या जातील. तसेच, वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत पूर्ण पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले जाईल. केंद्र व राज्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक पडल्यास सार्वजनिक क्षेत्रातील (पीएसयू) संस्थांचाही या खरेदी प्रक्रियेत समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले.




