'गोकुळ' निवडणूक निर्णय अधिकारीपदी मौसमी चौगुले; सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेश

'गोकुळ' निवडणूक निर्णय अधिकारीपदी मौसमी चौगुले; सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेश

कोल्हापूर/प्रतिनिधी : 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीच्या पुढील टप्प्याच्या कार्यक्रमासाठी राज्य निवडणूक विभागाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरच्या उपविभागीय अधिकारी (SDO) मौसमी चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी सोमवारी त्यांच्या नियुक्तीचे अधिकृत आदेश जारी केले.

 

मौसमी चौगुले या येत्या दोन दिवसांत 'गोकुळ' निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जांची छाननी, अर्ज माघार घेणे तसेच प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीचा सविस्तर निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करतील.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक देविदास गोसावी यांनी ४ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. नियमानुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दहा दिवसांच्या आत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे क्रमप्राप्त असते. त्यानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून 'गोकुळ'चे निवडणूक निर्णय अधिकारी कोण असणार, याबद्दल राजकीय आणि सहकार क्षेत्रात तर्कवितर्क लढवले जात होते. सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत चाचपणी सुरू होती. अखेर मौसमी चौगुले यांच्या नावावर मोहर उमटवण्यात आली असून, त्यांच्या मदतीसाठी दोन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे.