गोंदिया-बालाघाट महामार्गावर भीषण अपघात; ट्रक-बोलेरोची धडक, 6 जणांचा मृत्यू, 7 गंभीर

गोंदिया-बालाघाट महामार्गावर भीषण अपघात; ट्रक-बोलेरोची धडक, 6 जणांचा मृत्यू, 7 गंभीर

मुंबई (प्रतिनिधी) : गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागरा परिसरात भरधाव ट्रक आणि बोलेरो प्रवासी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक गोंदियाहून बालाघाटच्या दिशेने जात होता, तर बोलेरो प्रवासी वाहन बालाघाटकडून गोंदियाकडे येत होते. नागरा परिसरात दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की बोलेरो वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 मृत आणि जखमी प्रवासी मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, त्यांची अधिकृत ओळख आणि अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातामुळे गोंदिया-बालाघाट महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.