'जंतर-मंतरवर या, नाहीतर सार्वजनिक ठिकाणी चर्चा करा'; कॉकरोच जनता पार्टीची सरकारसमोर नवी अट

'जंतर-मंतरवर या, नाहीतर सार्वजनिक ठिकाणी चर्चा करा'; कॉकरोच जनता पार्टीची सरकारसमोर नवी अट

मुंबई (प्रतिनिधी) : कॉकरोच जनता पार्टीने सरकारसोबतच्या चर्चेसाठी नवी अट ठेवली आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी बुधवारी सांगितले की, सरकार चर्चेसाठी तयार असल्यास आम्हीही तयार आहोत. मात्र कोणत्याही नेत्याच्या घरात किंवा कार्यालयात बैठक होणार नाही. चर्चा करायची असेल तर ती जंतर-मंतरवर किंवा कॉन्स्टिट्यूशन क्लबसारख्या सार्वजनिक ठिकाणीच व्हावी, अशी त्यांची भूमिका आहे.

सौरव दास यांनी दावा केला की, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने संवाद सुरू करायला हवा होता. त्यांच्या मते, चर्चेतूनच तोडगा निघू शकतो, मात्र ती पारदर्शक आणि सर्वांसमोर होणे आवश्यक आहे.याआधी सोमवारी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती. जवळपास दोन तास झालेल्या चर्चेदरम्यान आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सरकारकडे सुपूर्द केले. या निवेदनात कथित परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे.

सीजेपीचे प्रतिनिधी आशुतोष रांका यांनी सांगितले की, सरकारकडून सध्या केवळ मागण्यांवर वरिष्ठ स्तरावर चर्चा करण्याचे आश्वासन मिळाले आहे. कोणताही अंतिम निर्णय किंवा ठोस हमी अद्याप देण्यात आलेली नाही.दरम्यान, आंदोलनादरम्यान संसदेकडे जाणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी अडवल्यानंतर अश्रुधुराचा वापर आणि लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये हा पहिला थेट संवाद झाला.

बैठकीनंतर जेपी नड्डा यांनी चर्चा सकारात्मक वातावरणात झाल्याचे सांगितले आणि आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र सीजेपीने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहणार आहे.