जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पदाबाबत महत्त्वाची अपडेट; उपायुक्त दीपक खरात यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार समाप्त
मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पदासंदर्भात राज्य शासनाने महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेल्या नवीन आदेशानुसार, या समितीच्या ‘उपायुक्त तथा सदस्य’ पदाचा अतिरिक्त कार्यभार आता बदलण्यात आला आहे. 9 सप्टेंबर 2026 रोजी मंत्रालयातून याबाबतचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत.

यापूर्वी 30 सप्टेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दीपक खरात यांच्याकडे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्यपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. मात्र, नवीन आदेशानुसार प्रशासकीय कारणास्तव खरात यांच्याकडील हा अतिरिक्त कार्यभार तातडीने समाप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांवर टीका केली होती. जात प्रमाणपत्र दिल्यानंतर पुन्हा जात पडताळणी कशासाठी? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला होता.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीचा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर मोठी मागणी ठेवली होती. राज्यातील जात पडताळणी समित्याच बरखास्त करा आणि जात पडताळणीच्या प्रक्रियेत आवश्यक ते बदल करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानंतर आता समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दीपक खरात यांच्याकडील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्यपदाचा अतिरिक्त कार्यभार समाप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे गेल्या 12 दिवसांपासून उपोषण करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 12वा दिवस आहे. दिवसेंदिवस मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, तरीही ते उपोषणावर ठाम आहेत. दरम्यान, 9 सप्टेंबर 2026 रोजी मंत्रालयातून याबाबतचे अधिकृत आदेश जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता दीपक खरात यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार समाप्त केल्यानंतर पुढील जबाबदारी कोणाकडे सोपवली जाते, याकडे लक्ष लागलं आहे.




