जिनिलिया आणि सासरे विलासराव देशमुख यांची पहिली भेट 'तो' खास प्रसंग
मुंबई (प्रतिनिधी): दादा वहिनी अर्थात अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे राज्याचे लाडके कपल. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून जिनिलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातून दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे त्यांनी डेट केलं. एकमेकांना समजून घेतल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असतात. दोघांचे एकत्रित व्हिडिओ प्रचंड व्हारयरल होतात.

2022 साली प्रदर्शित झालेल्या वेड चित्रपटातून दोघांनी एकत्र मराठी सिनेसृष्टीत काम केलं. या जोडीला आणि चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. 'वेड' चित्रपटादरम्यान रितेशने मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यानं, जिनिलिया देशमुख आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पहिली भेट कशी झाली होती? भेटीनंतर विलासराव देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली होती का? याबाबत सांगितले होते.
वेड चित्रपटाच्या प्रोमोशनदरम्यान जिनिलिया आणि विलासराव देशमुख यांच्या भेटीबद्दल रितेश म्हणाला, 'आईची भेट घेण्यासाठी जिनिलिया घरी यायची. माझ्या आईला अंदाज आला होता. कारण माझी कोणतीच मैत्रिण घरी जास्त येत नव्हती. एके दिवशी ती घरी आली, तेव्हा माझे वडील घराबाहेरील गार्डनमध्ये बसले होते. त्यांची मिटींग सुरू होती. तिनं जाता जाता वडिलांना 'हाय पप्पा' असं म्हटलं. तेव्हा माझ्या वडिलांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. फक्त मान हलवली होती', असं रितेश म्हणाला.
"त्यावेळी कदाचित वडिलांच्या मनात एक प्रश्न आला असावा. पण नंतर सगळं सुरळीत झालं. दोघांची भेट अशी झाली असली तरी, त्यांचं जिनिलियावर प्रचंड जीव होता. माझे वडील जिनिलियाला मुलगी मानत होते. खासकरून जिनिलियाचा गोड स्वभाव त्यांना खूप आवडत होता", असं म्हणत रितेश देशमुखने जुन्या आणि गोड आठवणींना उजाळा दिला होता. 3 फेब्रुवारी 2012 रोजी रितेश आणि जिनिलियाचं लग्न अगदी धुमधडाक्यात झालं होतं. दोघांच्या लग्नसोहळ्यात राजकीय नेत्यांपासून सिनेसृष्टीतील दिग्गजांची हजेरी पाहायला मिळाली होती.




