धाराशिवमध्ये पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा; मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नेत्यांविरोधात कैलास पाटील आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी

धाराशिवमध्ये पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा; मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नेत्यांविरोधात कैलास पाटील आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी

मुंबई (प्रतिनिधी) : धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे पक्ष सोडून पक्षांतर केलेल्या १३ नगरसेवक आणि ४ पंचायत समिती सदस्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मशाल चिन्हावर निवडून आलेल्या या सदस्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचं शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय न दिल्यास उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.आमदार कैलास पाटील यांच्या या भूमिकेमुळे पक्षांतर केलेल्या ठाकरे गटाच्या कळंबमधील ९ आणि धाराशिवमधील ४ नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.

शिवसेना ठाकरे पक्ष सोडून पक्षांतर केलेल्या १३ नगरसेवक आणि ४ पंचायत समिती सदस्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. मशाल चिन्हावर निवडून आलेल्या या सदस्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्यात येणार असल्याचं कैलास पाटील यांनी सांगितलं.

जिल्हाधिकाऱ्यांकडून वेळेत निर्णय झाला नाही, तर उच्च न्यायालयात जाऊन याप्रकरणी कालमर्यादा निश्चित करण्याची मागणी केली जाईल. त्यानंतर गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयातही जाणार असल्याचा इशारा कैलास पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, नगरसेवकांनी बंडखोरी केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आमदार कैलास पाटील आणि पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना अपात्र करण्याचा निर्णय घेण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यावर चर्चा झाली.

याबाबत माध्यमांशी बोलताना कैलास पाटील म्हणाले, "कळंबचे नगरसेवक असतील, धाराशिवचे पंचायत समिती सदस्य असतील किंवा धाराशिवचे नगरसेवक असतील, हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षावर मशालीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. कायद्यात ज्या तरतुदी आहेत, त्याप्रमाणे आम्ही वकिलांशी चर्चा करत आहोत."तिन्ही ठिकाणी पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांवर वकिलांचा सल्ला घेऊन लवकरात लवकर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

"आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरुवातीला अपील दाखल करत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन महिन्यांत याचा निकाल लावून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जर त्यांनी वेळ लावला, तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊन यासाठी कालमर्यादा ठरवून देण्याची विनंती करू," असं कैलास पाटील यांनी सांगितलं.शिवसैनिक आणि सर्वसामान्य मतदारांशी ज्यांनी घात केला आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना अपात्र करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांची फोडाफोड सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपमध्ये जाणाऱ्या काही नगरसेवकांचं रातोरात चक्र फिरलं आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.या नगरसेवकांच्या फोडाफोडीत २० लाखांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंत बोली लावली गेल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांनी केला आहे.

ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांनी नगरसेवक फोडाफोडीचा बाजार मांडला, असा घणाघात मकरंद राजे निंबाळकर यांनी केला.तसंच, "नगरसेवक फोडले, दम होता तर मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा राजीनामा घ्यायचा आणि मग त्यांना निवडून आणायचं," असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

कळंबमधील नगरसेवक राणा जगजितसिंह पाटील यांनी फोडल्याचा आरोपही त्यांनी केला. ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेली फोडाफोड खपवून घेतली जाणार नाही. येत्या काळात त्यांना धडा शिकवू, असा निर्धार ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आला.नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर ठाकरे गटाची बैठक पार पडली. यावेळी शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी आणि आक्रमकता पाहायला मिळाली.