नसरापूरचा नरकासुर मध्यरात्री गोठ्यात; पोलिसांची गुप्त कारवाई उघड

नसरापूरचा नरकासुर मध्यरात्री गोठ्यात; पोलिसांची गुप्त कारवाई उघड

पुणे (प्रतिनिधी) : पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी पोलीस सध्या युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री आरोपीला घटनेचे रिक्रिएशन करण्यासाठी नसरापूर येथील घटनास्थळी नेले होते. चिमुकली नेमकी कुठे खेळत होती, तिला कुठून सोबत घेतले आणि गाईच्या गोठ्यात कसे आणले, याची संपूर्ण माहिती पोलिसांनी आरोपीकडून घेतली. आता ही सविस्तर माहिती आरोपपत्रात नमूद केली जाईल. 

या घटनेनंतर नसरापूरसह राज्यभरात संतापाचे वातावरण व्हावे. चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी किंवा जमावाच्या हवाली करावे, अशी आग्रही मागणी होत आहे. अशा परिस्थितीत आरोपीला लोकांसमोर नेण्याचा धोका पोलीस पत्कारायला तयार नाहीत. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस काल मध्यरात्री कोणालाही सुगावा लागू न देता आरोपीला  घटनास्थळी घेऊन गेले होते. यानंतर आता आणखी कोणती नवी माहिती समोर येणार का, हे बघावे  लागेल. न्यायालयाने सध्या आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उद्याच्या सुनावणीत पोलीस न्यायालयात कोणती नवी माहिती सादर करणार, हे बघावे लागेल. 

ही लहान मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत पुण्यात राहत होती. शाळेला उन्हाळी सुट्टी लागल्याने ती आपल्या नसरापूर येथे आपल्या आजीच्या घरी गेली होती. त्यावेळी 1 मे रोजी तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, ससून रुग्णालयाकडून पिडीत मुलीचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल पोलिसांना नुकताच सुपूर्द केला होता. त्यानुसार,आरोपीने चिमुकलीच्या तोंडात गोळा कोंबून अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. 

चिमुकलीच्या मृतदेहाची गुणोत्तर तपासणी ससून रुग्णालयात झाली. त्यानंतर रुग्णालयाच्या न्याय वैद्यकीय शास्त्र विभागात वैद्यकीय तज्ञांनी मृतदेहाची इन कॅमेरा तपासणी केली. नराधमाने मुलीचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत जोरदार बुक्की मारल्याचेही  शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. यानंतर आरोपीने मुलीला दगडाने ठेचून मुलगी मेल्याचीही खात्री केली. यावरुन तिची किती निर्घृण पद्धतीने हत्या झाली असावी, याचा अंदाज होतो.