नेहरूंना मागे टाकणाऱ्या मोदींसाठी, मनसेकडून मोदींच्या 'महाविक्रमांचे' बॅनर्स झळकवत सिद्धिविनायक मंदिरात महापूजा!
मुंबई (प्रतिनिधी) : सर्वाधिक कालावधीसाठी देशाचे निर्वाचित पंतप्रधानपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. निर्वाचित पंतप्रधान म्हणून 4,399 दिवसांच्या सलग सेवेचा विक्रम प्रस्थापित करून त्यांनी 1952 ते 1964 या काळात 4,398 दिवस सलग सेवा बजावलेल्या जवाहरलाल नेहरू यांचा पूर्वीचा विक्रम मागे टाकला आहे. मोदींच्या या विक्रमानंतर भाजपकडून तसेच मित्रपक्षांकडून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षांव होत असतानाच आता मनसेने देखील सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान म्हणून निवडून येण्याचा विक्रम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करत सिद्धिविनायक मंदिरात पूजा केली आहे. मात्र महागाईच्या दरात, डॉलरच्या दरात तसेच बेरोजगारीच्या दरात देखील मोदींनी विक्रम केल्याबद्दल उपहासात्मक अभिनंदन करत मनसेने मोदींसाठी पूजा केली आहे. तसेच एकही पत्रकार परिषद न घेण्याचा विक्रम केल्याबद्दलही मनसेच्या वतीने मोदींच अभिनंदन करण्यात आलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे मोदींच्या अभिनंदनासाठी सिद्धिविनायक चरणी नतमस्तक झाले. काल (बुधवारी, दि १०) भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केलेल्या पूजेला मनसेकडून पूजा करत प्रतिउत्तर देण्यात आलं आहे.

तर मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी या सर्व संदर्भात सोशल मिडीयावरती एक पोस्ट शेअर केली आहे, पोस्टमध्ये देशपांडेंनी म्हटलंय की, "बाबूमोशाय जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही" कुठल्या व्यक्तीने कुठल्या पदावर किती वर्ष काम केलं या पेक्षां किती चांगलं काम केलं हे महत्वाचं ,नाही का ?" त्याचबरोबर एक पोस्टर शेअर केलं आहे, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असून पोस्टरवरती लिहलंय, "महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विक्रमवीर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अभिनंदन! सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम केल्याबद्दल, मोदीजी, आपले मनसे अभिनंदन ! सर्वाधिक महागाईचा दर विक्रम, मोदीजी, आपले मनसे अभिनंदन !
सर्वाधिक डॉलरचा दर विक्रम, मोदीजी, आपले मनसे अभिनंदन ! सर्वाधिक पेट्रोलचा दर विक्रम, मोदीजी, आपले मनसे अभिनंदन ! सर्वाधिक घरगुती गॅसचा दर विक्रम, मोदीजी, आपले मनसे अभिनंदन ! सर्वाधिक बेरोजगारीचा विक्रम, मोदीजी, आपले मनसे अभिनंदन ! तसेच एकही पत्रकार परिषद न घेण्याचा विक्रम, मोदीजी, आपले मनसे अभिनंदन ! असेच महाविक्रम मोदीजी, आपणांकडून होत रहावे ह्यासाठी श्री सिद्धिविनायकचरणी मनसे प्रार्थना !" अशी पोस्ट मनसे नेते संदीप देशपांडेंनी केली आहे.




