फुटबॉलमध्ये करिअरचे आमिष, अल्पवयीन खेळाडूवरील अत्याचार प्रकरणात प्रशिक्षकाला अटक

फुटबॉलमध्ये करिअरचे आमिष, अल्पवयीन खेळाडूवरील अत्याचार प्रकरणात प्रशिक्षकाला अटक

 मुंबई (प्रतिनिधी) : जगभरात सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या फुटबॉल या खेळाच्या विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत असताना, याच खेळात आपले भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना वसईत उघडकीस आली आहे. फुटबॉलच्या मैदानावर नाव कमावण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या या मुलीच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्याच प्रशिक्षकाने केलेले कथित कृत्य क्रीडा क्षेत्रालाच काळिमा फासणारे आणि अत्यंत क्लेशदायक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी खासगी फुटबॉल प्रशिक्षक अभिजित मेंडल (वय 36, रा. वसई) याला अटक केली असून त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी 2023 मध्ये फुटबॉलचे प्रशिक्षण घेण्यासाठी आरोपीकडे दाखल झाली होती. फुटबॉल क्षेत्रात मोठ्या संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवत आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच अत्याचारादरम्यान आरोपीने मुलीचे फोटो व व्हिडिओ काढून ठेवले होते. काही काळानंतर मुलीने संपर्क कमी केल्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव टाकल्याचाही आरोप आहे. मानसिक त्रास असह्य झाल्यानंतर पीडितेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. फुटबॉलच्या मैदानावर यशाचे स्वप्न पाहणाऱ्या एका अल्पवयीन खेळाडूचा विश्वास तुडवणारी ही घटना समाजमनाला अस्वस्थ करणारी ठरत आहे.